हृदय पिळवटणारी घटना! रुग्णवाहिका नाही, चिमुकल्यांचे मृतदेह घेऊन आईवडिलांनी 15 किलोमीटर तुडवली वाट
गडचिरोली : असहाय माता- पित्याला आपल्या दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर उचलून तब्बल 15 किलोमीटर चालत जावे लागल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात घडल्याचे समोर आले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोक यावर संताप व्यक्त करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार बाजीराव रमेश वेलादी (6 वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा, ता. अहेरी) अशी ही भावंडे आपल्या दोन दिवसांपूर्वी आईवडिलांसोबत पत्तीगाव येथे आजोळी आली होती. दोघांना ताप आला.
अशिक्षित आईवडिलांनी त्यांना दवाखान्यात नेण्याऐवजी पुजा-याकडे नेले, पण प्रकृती खालावल्याने दोन्ही भावंडांचा दोन तासांतच मृत्यू झाला. या घटनेनंतर पालकांनी दवाखाना गाठला; पण उशीर झाला होता. दोन्ही भावंडांचे मृतदेह घेऊन भाबडे पालक आशेपोटी हे दाम्पत्य जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले.

दोघा भावंडांचे मृतदेह येर्रागड्डा या गावी न्यावे लागणार होते, पण यावेळी आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका नव्हती. त्यामुळे देचलीपेठाहून रुग्णवाहिका बोलावण्याची तयारी केली. पण वेलादी दापत्याने मदत नाकारत दोघांना खांद्यावर घेऊन पत्तीगावची वाट धरली. नाले, चिखलाचा रस्ता असल्याने येथून वाहने जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांना पायपीट करावी लागली. त्यानंतर नातेवाइकाची दुचाकी बोलावून त्यावरून ते पत्तीगावला पोहोचले.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी यांनी माध्यमांना या घटनेबाबत स्पष्टिकरण देताना सांगितले की, दोन लहानग्या भावंडांचा मृत्यू झाल्याची माहिती खरी आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अस्पष्ट आहे. या चिमुकल्यांना आधी पुजाऱ्याकडे नेले होते. आरोग्य केंद्रात येण्यापूर्वीच ते मृत्युमुखी पडलेले होते. रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला, पण नातेवाईकांनी ऐकले नाही. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल मागविण्यात येईल.
वडेट्टीवारांचा फडणवीसांवर निशाणा
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होताच काॅंग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेचे एक भीषण वास्तव आज पुन्हा पुढे आले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेला हा जिल्हा.
हेलिकॉप्टरने विधानसभा मतदारसंघ पिंजून काढणारे महायुतीतील कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा हा मतदारसंघ. दोघेही महाराष्ट्रभर रोज इव्हेंट घेऊन आम्हीच कसा विकास करू शकतो हे सांगत असतात. दोघांनी एकदा जमिनीवर उतरून आपल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकं कसे जगतात, जिवंतपणी त्यांना मिळत असलेल्या मरणयातना एकदा या इव्हेंटबाज सरकारने प्रत्यक्ष जाऊनही बघावे" असे विजय वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications