'भिकारी' शब्द वापरला सुजय विखेंनी, भावना दुखावल्याचं मान्य केलं मंत्री विखेंनी; वाचा नेमकं प्रकरण
शिर्डीत भिकारी वाढलेत, असा शब्दप्रयोग काल माजी खासदार सुजय विखे यांनी शिर्डीतील एका कार्यक्रमात केला होता. भिकारी या शब्दावरुन त्यानंतर एकच गहजब झाला. सुजय विखेंनी साईभक्तांचा अपमान केल्याचं, बोललं गेले. आता याच विषयावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुजयच्या शब्दाचा विपर्यास करण्यात आल्याचं, मंत्री विखे यांचं म्हणणं होतं. मात्र विखे पिता-पुत्रात एका मुद्यावरुन मात्र मत-मतांतर दिसलं.

काय म्हणाले होते सुजय विखे?
काल शिर्डीतील एका कार्यक्रमात बोलताना सुजय विखे, यांनी शिर्डीत भिकारी वाढल्याचं सांगितलं होतं. ते म्हणाले होते, "साईसंस्थानच्या प्रसादालयातील मोफत जेवण बंद करा. जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे आमच्या मुलांच्या आणि मुलींच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करा. अख्खा देश इथे येऊन फुकट जेवण करतोय. महाराष्टातील सगळे भिकारी इथे गोळा झाले आहेत. हे योग्य नाही. या विरोधात आंदोलनाची वेळ आली तर आम्ही आंदोलन करू.
कशामुळे झाला होता वाद?
अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतोय. येथे भिकारी वाढलेत... असं सुजय विखे म्हणाले होते. मात्र त्यांच्या म्हणण्याचा उद्देश वेगळा होता. प्रसादालयात शुल्क आकारल्यावर त्यातून जमणाऱ्या पैशातून शिर्डीत शिक्षणाच्या सुविधा वाढवता येथील, असंही सुजय विखेंनी याच भाषणात सांगितलं होतं. मात्र भिकारी या शब्दाचा विपर्यास करुन सुजय विखेंनी साईभक्तांच्या भावना दुखावल्याच्या चर्चा झाल्या. सुजय विखेंनी साईभक्तांनाच भिकारी म्हटल्याचं, काहींचं म्हणणं होतं.
काय म्हणाले मंत्री विखे?
या सगळ्या प्रकरणानंतर आज पत्रकारांनी मंत्री विखे यांना सुजय विखेंच्य वक्तव्याबद्दल विचारले. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "सुजय विखे यांच्या शब्दाचा विपर्यास केला गेला. भिक्षेकऱ्यांचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. किंवा साईभक्तांचा अपमान करण्याचाही हेतू नव्हता. मध्यंतरी भिक्षेकऱ्यांचा प्रश्न फार गंभीर झाला होता. स्थानिक ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. सुजय विखेंनी जो शब्द वापरला त्यामुळे भावना दुखावल्या असतील. हे मी मान्य करतो. मात्र भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. भिक्षेकरी आणि साईभक्त यांच्यात अनेकदा वाद होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे याबाबत काहीतरी नियमावली तयार व्हावी, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शिर्डीत येणाऱ्या साईभक्तांना प्रसाद भोजन मोफत मिळाले पाहिजे. शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही. साईभक्तांच्या देणगीतूनच महाप्रसाद दिला जातो. तो निरंतर चालू राहील", असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
विखे वक्तव्यावर ठाम
वडिल मंत्री विखे यांनी मोफत जेवण सुरुच राहिल असं सांगितल्यावर सुजय विखे यांनी पुन्हा आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, "मी माझ्या वक्तव्याशी ठाम आहे. या वक्तव्याने कुठल्याही साईभक्ताला हिणवण्याचं कारण नाही. गेल्या तीन वर्षात 4000 हजार भिकाऱ्यांना पोलिसांनी अटक करून सुधारगृहात पाठवलंय. भिकारी याचा अर्थ भिकारीच, जे पोलिसांच्या अहवालात सांगितलं आहे. मोफत जेवणामुळे शिर्डीत अपराधी लोक, मोस्ट वाॉन्टेड लोक जे साईभक्त नाहीत त्यांची वाढ होतेय. याचा त्रास ग्रामस्थांना होतोय. साई संस्थांच्या प्रसादलायात जेवणाचे 10 रुपये दर आकारले तर योग्य ते मुल्यमापन केलं जाईल.", असं स्पष्टीकरण सुजय विखे पाटील यांनी दिलं.












Click it and Unblock the Notifications