शिवसेना नेते व माजी खासदार सतीश प्रधान यांचे निधन, नगराध्यक्ष ते खासदार असा होता प्रवास
ठाणे महानगरपालिकेचे प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान (वय ८४) यांचे रविवारी दुपारी २ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. सतीश प्रधान यांनी ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानावरून निघणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू म्हणून प्रधान यांची ओळख होती. ठाण्यात शिवसेना वाढवण्यात सतिश प्रधान यांचा मोठा वाटा होता.

कट्टर शिवसैनिक
सतीश प्रधान यांचा जन्म 29 ऑगस्ट 1940 रोजी झाला होता. ते ठाणे शहराचे पहिले महापौर होते. ते राज्यसभेतील शिवसेना पक्षाचे नेते होते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेच्या जडणघडणीत सतीश प्रधान यांची मोलाची भूमिका होती. ठाणे शहराच्या विकासामध्ये तसेच शिवसेनेच्या संघटनात्मक मजबुतीसाठी त्यांचे योगदान होते. त्यांनी ठाण्याचे नगराध्यक्षपदा बरोबरच महापौरपदही भूषवले होते.
नगराध्यक्ष ते खासदार
प्रधान हे राज्यसभेवर दोन वेळा निवडून गेले होते. संसदेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम केले होते. ठाण्याची नगराध्यक्ष ते राज्यसभेचे खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास राहीला आहे. ठाण्याच्या जडणघडणीमध्ये प्रधान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बाळासाहेबांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहीले जात होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील धार इथे झाला होता. पण त्यांची कर्मभूमी ही ठाणेच होती. ते संसदेत शिवसेनेचे गटनेते ही होते.
ठाण्याचे पहिले महापौर
काही दिवसांपासून सतीश प्रधान यांची तब्येत खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उचचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांनी ज्ञानसाधना महाविद्यालयाची १९८० साली स्थापन केले होती. माजी खासदार, ठाण्याचे पाहिले नगराध्यक्ष, पाहिले महापौर राहिले आहेत. ठाणे शहरात पहिली महापौर मॅरेथॉन सुरू केली. त्यांच्याकडे स्मार्ट सिटीची दूरदृष्टी होती.त्यांचे निधन म्हणजे ठाणे शहरासाठी तसेच शिवसेनेसाठी मोठी हानी आहे.
बाबरी प्रकरणातून निर्दोष मुक्तता
बाबरी प्रकरणात सतीश प्रधान यांच्यावर आरोपपत्र दाखल होते. त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली होती. त्यांनी कोर्टात म्हटले होते, "मी लालकृष्ण अडवाणी आणि मनोहर जोशी यांना जमावाला नियंत्रित करताना, त्यांना शांत करताना आणि पुढे जाण्यापासून रोखताना पाहिले होते. परंतु जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. जमावाच्या उद्रेकामुळे बाबरी मशीदची घटना घडली." काही दिवसांपूर्वी सतीश प्रधान यांची रुग्णालयामध्ये जाऊन शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली होती.












Click it and Unblock the Notifications