Ashadhi Ekadashi 2024 : एक तरी वारी अनुभवावी
Ashadhi Ekadashi 2024 : चंद्रभागेच्या वाळवंटात आहे. कळस दिसतोय. सभोवताली वैष्णवांची दाटी आहे. विठुनामाचा अखंड गजर कानी येतोय. माझी ही ७ वी वारी. पहिली वारी सन २०१६ सालची. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालो. वारी प्रत्यक्षात काय असते तेच अनुभवण्यासाठी मी वारीला गेलो होतो.

महेश थोरात (दादा माऊली) यांच्या सहकार्याने एका दिंडीत (घोरावडेश्वर प्रासादिक भजन मंडळात) सहभागी झालो. पुणे ते पंढरपूर पायी वारी. सकाळी ३.३० वाजता उठणे, दिंडीच्या पाण्याच्या टॅंकरखाली आंघोळ करून रस्त्यावरच नवीन कपडे परिधान करून दिंडीत भजन करत आम्ही मार्गस्थ झालो. पुढे हडपसर - लोणी काळभोर - उरळी कांचन- यवत- सणसर- वरवंड-उंडवडी गवळ्याची- बारामती- इंदापूर -अकलूज- माहळुंग- श्रीपुर- पिराची कुरोली करत करत वाखरी (म्हणजे पंढरपूरची सिमा) आणि मग पंढरपूर. हा अनुभव माझ्यासारख्या अस्सल लालबाग परळकरासाठी विलक्षण आहे.
प्रत्येक गावा गावांतून पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना संपूर्ण गाव, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी पालखी सोहळ्याचे जल्लोषात स्वागत करतात. ज्या गावात पालखीचा मुक्काम असतो त्या गावाला त्या दिवशी जत्रेचे स्वरूप असते. गावकरी ज्यांना जमेल तसे वारकऱ्यांची जेवणाचीही सोय करतात.
प्रत्येक टप्प्यावर समाज मंदिर, मंगल कार्यालय, ग्रामपंचायत शाळा हे मुक्कामाचे,जेवणाचे टप्पे असतात.
हे टप्पे गर्दीला अपुरेच असतात.म्हणूनच वारकरी रस्त्यावर दुतर्फा पथारी पसरून आभाळाकडे डोळे मिटून हरीनाम घेत बिनधास्त झोपतात.
चुकून पाऊस पडला तरी भिजण्याची त्यांची मानसिकता असते. हीच जगण्याची कला वारीत स्व चा शोध घ्यायला लावत असते. वेळप्रसंगी वारकरी महामार्गालगत असणाऱ्या स्मशानभूमीच्या शेडखाली देखील निवारा घेतात. कितीही गैरसोय होत असली तरी वारकऱ्यांच्या चेह-यावर कसलाही त्रास,नाराजी किंवा कंटाळा पणा दिसत नाही.
जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात आम्ही सहभागी झालेल्या दिंडीचा क्रमांक ३ आहे. या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यां कडून भोजन, अल्पोपहार शुल्क नाममात्र १०००/- रू. घेऊन नोंदणी केली जाते. प्रत्येक दिंडीत आचारी असतो. आणि जेवण करण्यासाठी लागणारी सामग्रीची देखील सोय केलेली असते. प्रत्येक दिंडी बरोबर दोन किंवा तीन ट्रक असतात. यामध्ये वारकऱ्यांचे कपडे आणि बिछाने ठेवण्याची व्यवस्था असते.
प्रशासनाच्या वतीने वारकऱ्यांच्या आंघोळीसाठी पाण्याचे टँकर ठिकठिकाणी लावलेले असतात.
तसेच सुलभ शौचालये मोबाईल व्हॅन देखील मागील ७ ते ८ वर्षांपासून सुरू केलेले आहेत. प्रशासन त्यांच्या परीने प्रयत्न करत आहे पण दर वर्षाला वारकऱ्यांची मांदियाळी मात्र वाढत आहे. देव भक्तीचा भुकेला आहे आणि तीच भक्ती दर वर्षी ओसंडून वाहत आहे.
भक्तीचा हा महिमा अगाध आहे
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या रथापुढे मानाच्या २७ दिंड्या भजन करत मार्गस्थ होतात. आणि रथामागे नोंदणी केलेल्या ३५० दिंड्या असतात.रथाच्या पुढे असणा-या प्रत्येक दिंडीत अंदाजे ५०० वारकरी असतात. आणि रथामागील दिंड्याचे वारकरी असे पोलिसांनी नोंदणी केलेल्या जवळपास दिड लाख वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात असतो. ही अधिकृत नोंदणी असते. यांच्या पेक्षाही जास्त वारकरी संप्रदाय वैष्णवांचा मेळा वारीत असतो.
प्रत्येकाच्या डोळ्यातून मला फक्त आणि फक्त विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता वारकरी संप्रदाय भंजन किर्तन करत करत पुढे चालतच असतो. कितीही गैरसोय होत असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून एकमेकांना मदत करत वारकरी भजनात दंग झालेले असतात. प्रत्येक वारकरी एकमेकांना भेटतात तेव्हा पाया पडतात.
"जय हरी माऊली" म्हणतात.
पाया पडताना वयाचे बंधन नसते.
कारण तो नमस्कार त्यांच्यातील देवत्वाला असतो. बेभान होऊन या सोहळ्यात वारकरी भजन कीर्तन करतात. फेर धरून नाचतात,साक्षात परमेश्वर आपल्या सोबत आहे हिच श्रध्दा प्रत्येकाची असते.
मला ही अनूभूती आली. त्या पांडुरंगाने नाम्याची गुरे राखली, चोखोबाची खीर चाखली, जनाबाईचे दळण दळले तसेच कित्येक वर्षे तो वैष्णवांची वारीत काळजी घेतोय. त्यांच्या समस्यांचे निराकरण करतोय.
वारीत आत्मसुखाचा अनुभव आहे.
वारीत स्व चा शोध आहे.
एकदा तरी वारी अनुभवावी या उद्देशाने मी वारी केली.
पण...आता त्याच वारीत संत महंत आणि भगवंताची कृपादृष्टी, सहवास जाणवतोय म्हणून ही वारी सतत होत आहे. वारकरी अंतःकरणाने भजनात समारोपाच्या वेळी एक कवन आवर्जून म्हणतात,
"पंढरीचा वारकरी वारी चुको ने दी हरी." माझीही तीच इच्छा आहे.
लेखक- सुनील सावंत, काळाचौकी, मुंबई












Click it and Unblock the Notifications