शेतकऱ्याचा सवाल अन् फडणवीस संतापले; रोहित पवार म्हणाले- मानलं तुमच्या संवेदनशिलतेला...Video!
Maharashtra Flood Relief : महाराष्ट्रातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरा सुरू केला आहे.

दौऱ्यादरम्यान, एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना 'हेक्टरी किती मदत देणार?' असा थेट प्रश्न विचारला, त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'राजकारण करू नका' असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. त्या सवाल जवाबाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत फडणवीस यांना खोचक टोला लगावला, म्हणाले- फडणवीस साहेब मानलं तुमच्या संवेदनशिलतेला.
मा.फडणवीस साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 24, 2025
अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याला “हेक्टरी किती मदत देताय ?” हा प्रश्न आपल्याला राजकारण वाटत आहे....मानलं तुमच्या संवेदनशिलतेला...
अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याची एकच मागणी आहे हेक्टरी ५० हजार मदत आणि ओल्या दुष्काळाची घोषणा ...परंतु आपण मात्र हेक्टरी… pic.twitter.com/dB5zd7gKcR
काय म्हणाले रोहित पवार?
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडिओ ट्वीट करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. "अतिवृष्टीने हतबल झालेल्या शेतकऱ्याचा हा प्रश्न तुम्हाला राजकारण वाटतो आहे. तुमच्या संवेदनशीलतेला मानले," असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांची मागणी हेक्टरी ५० हजार रुपये मदत आणि ओल्या दुष्काळाची घोषणा आहे, पण सरकार कोरड्या घोषणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या व्यथा खऱ्या अर्थाने समजून घेण्याचा सल्ला देत, केवळ 'नावाला दौरे करू नका' असे म्हटले आहे.
दिवाळीपूर्वी मदत देण्याचे आश्वासन
पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना मदत दिली जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारने नुकताच २ हजार कोटी रुपयांचा निधी जाहीर केला असून, त्यातून शेतकऱ्यांना, तसेच ज्यांच्या घरांचे आणि अन्नधान्याचे नुकसान झाले आहे, त्यांनाही मदत केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. मदत करताना कोणतेही कडक निकष न लावता, गरजूंना तातडीने मदत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.
या परिस्थितीत, एकीकडे सरकार मदत देण्याचे आश्वासन देत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना 'राजकारण' म्हणून संबोधल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे.












Click it and Unblock the Notifications