मराठवाड्यात मनोज जरांगेंचा प्रभाव संपला..? काय सांगतोय एक्झिट पोल, वाचा सविस्तर
Maharashtra Exit Poll 2024- लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे फॅक्टरने महायुतीची झोप उडवली होती. मराठा आंदोलनाचा फटका महायुतीला बसल्याचे त्यावेळी बोलले गेले. त्यामुळे विधानसभेतही महायुतीला मनोज जरांगे फँक्टरचा फटका बसेल, असे बोलले जात होते. किमान, मनोज जरांगे ज्या मराठवाड्यातून मराठा आंदोलनाचे नेतृत्व करतात त्या मराठवाड्यात तरी महायुतीला फटका बसेल, असे सांगितले जात होते. मात्र निवडणुकीनंतर आलेल्या अनेक सर्व्हेमधून धक्कादायक अंदाज समोर आले आहेत.

काय सांगतात एक्झिट पोल
मराठवाड्यात विधानसभेच्या 46 जागा आहेत. गेल्यावेळी मराठवाड्यात महायुती व महाविकास आघाडीला संमिश्र कौल मिळाला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये मात्र वातावरण अगदीच बदल्याचं सांगितलं जात आहे. अॅक्सिसने नुकताच त्यांचा अंदाज जाहीर केला. त्यात मराठवाड्यात 46 पैकी तब्बल 30 जागांवर महायुती विजयी होण्याच अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पोलनुसार महाविकास आघाडीला फक्त 15 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. शिवाय एका जागेवर अपक्षाचा दावा सांगितला गेला आहे. महायुतीसाठी अंदाजाची ही आकडेवारी, गेल्यावेळीपेक्षा तब्बल दुप्पट असल्याने चर्चा वाढल्या आहेत.
मराठवाड्यातूनच झाली मराठा आंदोलनाची सुरुवात
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी हे गाव मराठवाड्यात आले. त्याच गावातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन उभं राहीलं. आंदोलनादरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याने लोकसभेला महायुतीला फटका बसला होता. यंदा विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. सरकार विरोधात असलेल्या मराठा समाजाच्या रोषाचा सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसेल असा अंदाज होता, मात्र एक्झिट पोलनुसार मराठवाड्यात महायुतीचे तब्बल 30 उमेदवार निवडून येण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी 15 जागांवर विजय मिळवण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील का
काल म्हणजेच बुधवारी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. राज्यात महायुतीचं सरकार असतानाच मराठा समाजाने आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं. त्याचं नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र एक्झिट पोलचे अंदाज एकदम विरुद्ध आल्याने ते खरे ठरतील का, या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.












Click it and Unblock the Notifications