एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वच पक्षातील नेत्यांचा ओघ!
Eknath Shinde's Shiv Sena has increased inflow of leaders from all parties : एकनाथ शिंदे हे तळागाळातून वर आलेले नेतृत्व आहे. एक साधा शिवसैनिक, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, आमदार, मंत्री, आणि मुख्यमंत्री असा मोठा प्रवास शिंदे यांनी केला आहे. या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी स्वतःला सिद्ध केले. प्रत्येक पदावर काम करत असताना माणसे जोडली आणि जोडलेली माणसे टिकवून ठेवली. त्यामुळेच त्यांचा गोतावळा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. आणि रोज त्यात नवनवीन व्यक्तींची भर पडत आहे.
2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वालाच आव्हान दिले. शिवसेनेचा पक्षप्रमुख राज्याचा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेतृत्वाने बंड करावे, हेच मुळात धक्कादायक होते. शिंदे यांच्याबरोबर किती आमदार जाणार आहेत, याचा अंदाज कुणाला आला नाही आणि बोल बोल म्हणता उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी रिकामी करून टाकली.खेड्यापाड्यातले आमदार शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. विविध भागातले जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख, तालुकाप्रमुख, लोकप्रतिनिधी, माजी आमदार, सिने जगतातले तारे अशा सर्वांनीच शिंदे यांच्या पाठीशी उभे राहणे पसंत केले. लोकसभा निवडणुकीतही एकनाथ शिंदे यांनी स्वतःचे नेतृत्व सिद्ध करताना उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा चांगला स्ट्राईक रेट दाखवला.

सोबत असलेल्या प्रत्येकाला न्याय
"आपल्याबरोबर आलेल्या एकाही आमदाराचे नुकसान होणार नाही", अशी ग्वाही शिंदे यांनी सुरुवातीलाच दिली होती. दिलेल्या शब्दाला शिंदे जागले. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व आमदारांना त्यांनी तिकिटे दिलीच. ज्यांची तिकिटे कापली गेली, त्यांनाही शिंदे यांनी शब्द दिला आहे. ज्या खासदारांची तिकिटे कापण्यात आली त्यांना विधान परिषदेवर शिंदे यांनी संधी दिली. शिंदे आपले नुकसान करणार नाहीत याची ठाम खात्री त्यांच्या पक्षात कार्यरत असलेल्या सर्वच स्तरावरील नेत्यांना आलेली आहे. म्हणूनच शिंदे यांच्या नेतृत्वाला कुणीही आव्हान दिलेले नाही किंवा त्यांच्या नेतृत्वावर साधी नाराजी सुद्धा जाहीरपणे व्यक्त केलेली नाही, हे या नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला आणि महाविकास आघाडी जिंकली. या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलली. सर्वच पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्या नेत्यांचा ओघ प्रचंड वाढला. पण एकनाथ शिंदे यांच्या पक्षातून एकही मोठा नेता फुटलेला नाही उलट शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्या नेत्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.
राजकीय परीघाबाहेरील व्यक्तीही शिवसेनेत
शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आल्यानंतर आमदार तसेच अन्य लोकप्रतिनिधी शिवसेनेत दाखल झालेच पण राजकीय परिघाच्या बाहेर असलेल्या अनेकांनी शिंदे यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवला. काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, मराठी सिने अभिनेते सुशांत शेलार, काँग्रेसचे माजी खासदार आणि सिने अभिनेते गोविंदा अशा व्यक्तींचा पक्षप्रवेश शिंदे यांच्या बहुआयामी नेतृत्वावर शिक्कामोर्तब करतो.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ओघ वाढला
विधानसभा निवडणूक तोंडावर येताचं शिंदे यांच्या शिवसेनेतला ओघ आणखी वाढला. अंधेरी पूर्व येथील भाजपाचे नेते मुरजी पटेल, मुंबादेवीच्या भाजपच्या नेत्यांना एनसी, बार्शीचे अपक्ष आमदार राजा राऊत, नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे, भाजपचे नेते तसेच माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव,माजी खासदार राजेंद्र गावित,भाजपचे भिवंडी येथील माजी नगरसेवक संतोष शेट्टी या नेत्यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम हे देखील शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाले.
उद्धव ठाकरे गटाचे असंख्य नेते शिंदे यांच्या सेनेत सहभागी होतचं आहेत. शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, बोईसरचे विलास तरे,रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. उबाठा गटाचे हिकमत उधान, काँग्रेसच्या कोल्हापूर मधील माजी आमदार जयश्री जाधव असे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी झाले आहेत. कल्याण ग्रामीण मधून मनसेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला.
शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास
राजकारणातल्या व्यक्तींना वाऱ्याचा अंदाज फार लवकर येतो. आपल्या नेतृत्वाला कुठे संधी आहे हे राजकीय व्यक्तींना नेमके कळते. आणि कोणता नेता आपल्याला न्याय देऊ शकतो याचेही ठोकताळे राजकारणातल्या लोकांनी बांधलेले असतात. एकनाथ शिंदे यांच्याकडे वाढलेला ओघ लक्षात घेता शिंदे यांच्या नेतृत्वावर कार्यकर्ते पदाधिकारी यांचाच अधिक विश्वास असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी अनेक चांगली कामे केली. असंख्य योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर प्रचंड लोकप्रिय ठरली.
पायाभूत सुविधांचे अनेक प्रकल्प एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखालीच मार्गी लावण्यात आले तर महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानेच झाले. सतत लोकांमध्ये राहणारा आणि सामान्य माणसाचा विचार करणारा मुख्यमंत्री अशी आपली प्रतिमा एकनाथ शिंदे यांनी निर्माण केली आहे.
"24 तास राबणारा मुख्यमंत्री" अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणूनही शिंदे महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यांच्या प्रतिमेचा फायदा आपल्या राजकारणालाही होईल, अशी खात्रीच पक्षात नव्याने येणाऱ्या राजकीय व्यक्तींना आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांच्याकडे ओघ वाढत चाललेला आहे. उद्धव ठाकरे यांचा गट मात्र याबाबतीत खूपच मागे पडल्याचे दिसून येत आहे












Click it and Unblock the Notifications