ठाकरे उद्या PAKला सोबत घेतील, घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, शिंदेंचा निशाणा!
Eknath Shinde Attacks Uddhav Thackeray: 'Will Join Pakistan Next : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाविकास आघाडीवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.
छत्रपती संभाजीनगर येथे उद्धव ठाकरे गटाने काढलेल्या 'हंबरडा मोर्चा'ला एमआयएम (MIM) चा पाठिंबा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भूमिकेवर थेट निशाणा साधला.
तसेच, 'ठाकरे ब्रँड'च्या मुद्द्यावरून त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करत, आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच विजयी होईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. तर ठाकरेंच्या भविष्यातील राजकारणावर देखील हल्लाबोल चढवला.

'निवडणुका जिंकण्यासाठी उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील'
संभाजीनगरमधील मोर्चात महाविकास आघाडीने एमआयएमला सोबत घेतल्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी खळबळजनक विधान केले. "हे लोक निवडणुका जिंकण्यासाठी कोणालाही सोबत घेतील. आज एमआयएम आहे, उद्या पाकिस्तानलाही सोबत घेतील. त्यांचा काही भरोसा राहिलेला नाही."
शिंदे यांनी यापूर्वीच्या निवडणुकींचा संदर्भ देत आरोप केला की, "मागच्या निवडणुकीत पाकिस्तानचे झेंडे नाचवले गेले. काहींनी दहशतवाद्यांच्या कबरी सजवण्याचे काम केले होते."
निवडणूक आयोगावर टीका
जे लोक यापूर्वी घटनात्मक पदांवर आणि निवडणूक आयोगावर टीका करत होते, तेच आज आयोगाकडे जात आहेत. "ही चांगली सुधारणा म्हणावी लागेल," असा टोलाही त्यांनी लगावला.
बाळासाहेब ब्रँडच आमचा ब्रँड
उद्धव ठाकरे यांनी 'ठाकरे ब्रँड'बाबत केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. "आमचा एकच ब्रँड आहे. बाळासाहेब ठाकरे ब्रँड. त्याच विचारांवर आणि केलेल्या विकासकामांच्या जोरावर महायुती येणाऱ्या निवडणुकीत विजयी होणार, असा माझा ठाम विश्वास आहे."
"मी फक्त बाळासाहेब ब्रँड ओळखतो, बाकी कोणताही नाही," असे सांगत त्यांनी 'बाळासाहेब ठाकरे' यांच्या विचारांशी असलेले आपले नाते पुन्हा एकदा अधोरेखित केले.
'घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत'
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चावर टीका करताना मुख्यमंत्री शिंदे यांनी 'हंबरडा' (रडणे) या शब्दावरून जोरदार निशाणा साधला. "कधी घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडत आहेत. जेव्हा लोकांच्या सेवेसाठी बाहेर पडायची वेळ होती, तेव्हा हेच लोक म्हणायचे आमचे हात रिकामे आहेत. आता अचानक भावनिक मोर्चे काढून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला जातोय," अशी टीका त्यांनी केली.
'पुतणा-मावशीचे प्रेम'
शेतकऱ्यांच्या नावाने काढलेला हा मोर्चा म्हणजे "हे पुतणा-मावशीचे प्रेम आहे. निव्वळ राजकीय नाटक आहे," अशा शब्दांत त्यांनी या मोर्चावर ताशेरे ओढले.
खरा हंबरडा
"सत्ता गेली तेव्हा हंबरडा फोडला, खुर्ची गेली तेव्हा हंबरडा फोडला. आता शेतकऱ्यांच्या नावाखाली हंबरडा फोडत आहेत. हे कसले हंबरडा मोर्चे काढतात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज: 'दिवाळी चांगली झाली'
शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सरकारने केलेल्या कामाचा जोरदार बचाव केला. "राज्यातील शेतकरी संकटात आहेत. आम्ही त्यांच्या बांधाबांधावर गेलो. आम्ही एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून, अटीशर्ती न पाहता मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली," असे ते म्हणाले.
३२ हजार कोटींचे पॅकेज
"आम्ही ३२ हजार कोटींचे पॅकेज दिले. ४७ हजार हेक्टरी मदत केली, तर जमीन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना मनरेगामार्फत प्रत्येकी साडेतीन लाख रुपये दिले. इतिहासात कधीच इतकी मदत शेतकऱ्यांना मिळाली नव्हती," असा दावा त्यांनी केला.
राजकारण नको
"शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली. त्यांचा दसरा चांगला झाला, दिवाळी आणखी चांगली होईल. आम्ही प्रत्यक्ष मदत पोचवली, मोठमोठे किट दिले. पण हे लोक शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करत आहेत. शेतकऱ्याच्या पोराच्या डोळ्यात अश्रू पाहून किमान बिस्किटचा पुडा तरी दिला का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.












Click it and Unblock the Notifications