सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट..? एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला, वाचा नेमकं काय झालं...
भाजपशी होत असलेल्या ठाकरे गटाच्या जवळीकीबाबत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडकून टिका केली. सरडे रंग बदलतात हे महिती होतं, पण एवढ्या फास्ट रंग बदलतात हे महिती नव्हतं, असा टोला शिंदे यांनी लगावला. ठाकरे गटाची भाजपशी जवळीत शिंदे यांना आवडलेली नाही, हे त्यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले. याशिवाय त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबतही उद्धव ठाकरेंवर जोरदार टिका केली.

नेमकं काय घडलं?
शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे व त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सामनातूनही फडणवीस यांचे कौतूक करण्यात आले. या सर्व प्रकारानंतर ठाकरे कुटुंब हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. भाजपनेही राजकारणात काहीही होऊ शकतं, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. त्यानंतर शिंदे गटाचे नेते व स्वतः एकनाथ शिंदे यांनी या प्रकारावर भाष्य केले. यापूर्वी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सापांना जवळ करून नका, सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. आता खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आज ठाण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रकारावर भाष्य केले. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना मला रोज शिव्या दिल्या जात होत्या. माझ्यावर उठसूट आरोपही केले जात होते. मलाच नव्हे तर त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही खालच्या थरावर आरोप करण्यात आले होते. फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचे प्रयत्न त्यांनी केले होते. एक तर तू राहशील नाही तर मी राहिली अशी भाषाही त्यांनी केली होती. पण आता पाहा किती बदल झालाय? काय जादू झाली समजत नाही? सरडे रंग बदलतात. पण एवढ्या फास्ट रंग बदलणारे सरडे मी पाहिले नाहीत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
स्मारक सरकारचं आहे
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्याला त्यांचे विचार मानणारे येतील, त्यांचे विचार सोडणाऱ्यांचा संबंध नाही, असे विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्या विधानाचाही शिंदे यांनी चांगलाच समाचार घेतला. शिंदे म्हणाले, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना कार्यक्रमाला बोलावणार नाही, असं ते म्हणाले. अरे पण कार्यक्रम कुणाचा आहे..? बाळासाहेबांचं स्मारक कोण बांधतोय..? हे त्यांना माहित आहे का, सरकार बांधतंय. बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही. त्यामुळे त्यांना हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिंदे यांनी केली.












Click it and Unblock the Notifications