लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी मिळणार?; एकनाथ शिंदेंनी अधिवेशनात सगळंच सांगून टाकलं!
Maharashtra Winter Session Nagpur 2025 : नागपूर हिवाळी अधिवेशनात आज 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनी योजनेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची लक्षवेधी सभागृहात मांडली, ज्यामुळे या योजनेतील भ्रष्टाचारावर मोठी चर्चा झाली. तर कॉंग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी लाडक्या बहीणींना 2100 रुपये कधी दिले जाणार, असा सवाल केला. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
योजनेत १६४ कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप
ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी लक्षवेधी मांडताना गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १२ हजार ४३१ पुरुषांनी प्रत्येकी १५०० रुपये घेऊन एकूण १६४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. या लक्षवेधीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जयंत पाटील, मंत्री आदिती तटकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मत मांडले.

जयंत पाटील यांचा टीकास्त्र आणि KYC चा मुद्दा
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार जयंत पाटील यांनी योजनेच्या अटी आणि भ्रष्टाचारावरून सरकारवर टीका केली. निवडणुकीच्या वेळी ही योजना जाहीर झाली तेव्हा अशा अटी सांगितल्या होत्या का? ज्या लोकांनी चुकीचे फायदे घेतले, त्यांच्यावर कारवाई होणार का? योजना जड जाऊ लागल्यामुळे आता सरकारने KYC आणि इतर कडक अटी योजनांमध्ये घातल्या आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
◻️LIVE 📍विधान भवन, नागपूर 🗓️ 10-12-2025
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 10, 2025
📹 राज्य विधिमंडळ हिवाळी अधिवेशन - विधानसभेतून लाईव्ह
https://t.co/u7elIctyw5
मंत्री आदिती तटकरेंनी काय दिले उत्तर?
पहिल्या शासन निर्णयातच २ कोटी ६३ लाख लोकांची पडताळणी सुरू केली आहे. इतर विभागांतही डेटा तपासला जात आहे आणि ई-केवायसीचे धोरण आणले आहे. अनेक महिलांचे बँकेत खाते नसल्याने त्यांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरुषाचे खाते दिले आहे, यासाठीच KYC प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या पुरुषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले आहेत, ती खाती तपासली जातील. योजनेचा फायदा खरंच पुरुष घेत असतील, तर नक्कीच कारवाई केली जाईल, असे आश्वासन मंत्री आदिती तटकरे यांनी सभागृहात दिले.
'योजना कधीही बंद होणार नाही', शिंदेंचे जाहीर विधान
या संपूर्ण चर्चेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात या योजनेबाबत मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले, ज्यामुळे विरोधकांच्या टीकेला उत्तर मिळाले. "विरोधक सातत्याने बोलत होते की, लाडकी बहीण योजना बंद होणार. मात्र, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, हे मी आजही सांगतो," असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, ही योजना बंद करण्यासाठी कोर्टात कोण गेले होते? वडपल्लीवार हा नाना पटोले यांचा माणूस होता. विरोधक म्हणाले होते, ही निवडणूक पुरती घोषणा आहे. हायकोर्टाने तुम्हाला चपराक दिली." काँग्रेस नेते नाना पटोले यांनी 'लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी देणार?' असा प्रश्न विचारला होता. यावर शिंदे म्हणाले, "आम्ही योग्यवेळी २१०० रुपये देऊ." असे म्हणत त्यांनी पटोले यांच्या प्रश्नाला देखील उत्तर दिले.












Click it and Unblock the Notifications