Eknath Shinde : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल एकनाथ शिंदेंचे मोठे वक्तव्य, केला हा दावा
Eknath Shinde : राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. त्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. यात विजय कुणाचा होणार हे मात्र, अद्याप स्पष्ट नसले तरी यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळेल," असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. ही निवडणूक कामगारांसाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले.
#WATCH | Mumbai | Maharashtra Dy CM Eknath Shinde said, "There are elections for local self-government institutions, district councils, municipalities, and municipal corporations. This meeting was held against this backdrop... This is an election for the workers. These same… pic.twitter.com/ETgMDcIpwk
— ANI (@ANI) September 24, 2025
महायुतीच्या विजयाचा दावा
"ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत विजयी करून दाखवले, तेच कार्यकर्ते या निवडणुकांमध्येही महायुतीला प्रचंड बहुमत मिळवून देतील," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एनआयशी बोलताना म्हणाले. विधानसभेत मिळालेल्या प्रचंड बहुमताचा संदर्भ देत त्यांनी आगामी निवडणुकांमध्येही त्याच यशाची पुनरावृत्ती होईल, असा दावा केला.
तीन टप्प्यांत निवडणुकांचा प्रस्ताव
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकांचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयोगाने निवडणुका तीन टप्प्यांत घेण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
पहिला टप्प्यात नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका, दुसरा टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आणि तिसऱ्या आणि अंतीम टप्प्यात जानेवारी २०२६ मध्ये मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या प्रस्तावामुळे, मुंबई महापालिकेसह इतर महापालिकांच्या निवडणुकीसाठी तयारीला काहीसा वेळ मिळणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत या महापालिकांच्या प्रभाग रचनेचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मैदानात
राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि पुराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. "आज मंत्रिमंडळात या विषयावर चर्चा झाली. मुख्यमंत्री सोलापूरला जातील, तर मी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेईन," असे ते म्हणाले.
जिल्हा नियोजन बैठकीत लोकप्रतिनिधींच्या सूचनांना प्राधान्य
जिल्हा नियोजन बैठकीत विविध मूलभूत सुविधांबाबत विस्तृत चर्चा झाल्याचेही शिंदे यांनी सांगितले. बैठकीत सर्व लोकप्रतिनिधी, आमदार आणि खासदारांनी दिलेल्या सूचना गांभीर्याने घेण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना या सर्व सूचनांची अंमलबजावणी करून लोकांना न्याय देण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीचा निकाल खूप चांगला लागेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.












Click it and Unblock the Notifications