"सत्ता येईल आणि जाईल, पण विचारधारेशी तडजोड नाही!" अंबरनाथ BJP-काँग्रेस युतीवर एकनाथ शिंदेंचा प्रहार
Eknath Shinde's Blunt Attack on BJP-Congress Alliance in Ambernath : "हा एकनाथ शिंदे खुर्चीसाठी लढत नाही. सत्ता मिळवण्यासाठी विचारधारेशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही," अशा कडक शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. अंबरनाथमध्ये भाजपने शिवसेनेला (शिंदे गट) बाजूला सारत काँग्रेसशी हातमिळवणी केल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

अंबरनाथमधील 'अनैसर्गिक' युतीवर स्पष्टच बोलले
अंबरनाथमध्ये स्थानिक पातळीवर भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. यावर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, "जे घडतंय ते विचारधारेच्या पलीकडचे आहे. याबाबत मी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली होती. तिथे जे सुरू आहे, ते आमच्या मूळ विचारसरणीशी सुसंगत नाही, याची जाणीव मी त्यांना करून दिली आहे." शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारी संघटना आहे आणि सत्तेसाठी आम्ही तत्त्वे सोडणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
फडणवीसांशी 'कोल्ड वॉर'? शिंदेंनी दिले मनाचे मोठेपण
गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात 'कोल्ड वॉर' सुरू असल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर पडदा टाकताना शिंदे म्हणाले की, "हे सगळे माध्यमांनी रंगवलेले विषय आहेत. देवेंद्रजी आणि माझे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. ते आमदार असल्यापासून आमची ओळख आहे. आम्ही एकमेकांना कधीही मोठे-छोटे मानले नाही. मी मुख्यमंत्री असतानाही त्यांना मुख्यमंत्रीच मानत होतो. आमचा अजेंडा एकच आहे-राज्याचा विकास!"
विरोधकांच्या 'ईव्हीएम' रडगाण्यावर टोला
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा शिंदेंनी समाचार घेतला. "लोकसभेत जागा जास्त आल्यावर विरोधक गप्प होते, पण विधानसभेत पराभव दिसू लागताच त्यांना ईव्हीएम आणि गैरप्रकारांची आठवण झाली. विरोधकांकडे ठोस मुद्दे नसल्यामुळे ते केवळ आरोपांचे राजकारण करत आहेत," असे ते म्हणाले.
"आम्ही डॉक्टर नाही, तरीही ऑपरेशन केलं!"
२०२२ मधील सत्तांतराचा संदर्भ देताना शिंदे यांनी मिश्किल टिप्पणी केली. "आम्ही डॉक्टर नसलो तरी राज्याच्या हितासाठी एक मोठे 'राजकीय ऑपरेशन' केले. ते पाऊल महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीच होते," असे सांगत त्यांनी आपल्या बंडाचे समर्थन केले. तसेच, "मी एकदा काही ठरवलं की ते पूर्ण करतो. आपण जे बोलतो ते करून दाखवतो आणि कधी कधी न बोलताही काम करतो," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुंबईच्या विकासाचा 'व्हिजन प्लॅन'
राज्याच्या अर्थव्यवस्थेबद्दल बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. मुंबईत पायाभूत सुविधांचे जाळे विणले जात असून पुढील प्रकल्पांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले:
- वाहतूक कोंडी फोडणार : बांद्रा-वर्सोवा सी लिंक विरारपर्यंत नेणार.
- नवीन रस्ते : छेडानगर ते साकेत आणि फाउंटन हॉटेलपर्यंत एलिव्हेटेड रोड.
- अद्ययावत तंत्रज्ञान : बीकेसी-कुर्ला अंडरग्राउंड टनल आणि पॉड टॅक्सी.
- खड्डेमुक्त मुंबई: "आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही काम करणारे लोक आहोत. मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.












Click it and Unblock the Notifications