वरळीत नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे आमनेसामने; कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी
मुंबई: नारळी पौर्णिमेनिमित्त वरळीच्या कोळीवाड्यात आज एक वेगळाच राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्थानिक आमदार आदित्य ठाकरे एकाच वेळी कोळीबांधवांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी केला हस्तक्षेप
वरळी, जो आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तिथे शिंदे यांच्या आगमनाने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते समोरासमोर आले. अरुंद रस्त्यांवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते, ज्यामुळे काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता होती. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले आणि दोन्ही नेत्यांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.
पाच मिनिटांच्या संघर्षात काय घडले?
या घटनेदरम्यान सुमारे पाच मिनिटांपर्यंत दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आमनेसामने होते. एकनाथ शिंदे कोळीवाड्याच्या एका बाजूने परत जात असताना, आदित्य ठाकरे त्यांच्याकडे पाहत होते आणि नंतर ते समुद्राच्या दिशेने पुढे गेले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत दादर-माहिमचे आमदार महेश सावंत आणि आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.
या संपूर्ण घटनेत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने दोन्ही गटांनी आपल्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातून राजकीय संघर्षही समोर आला.












Click it and Unblock the Notifications