लाडकी बहीण योजनेची सुपरफास्ट अंमलबजावणी; मुख्यमंत्री शिंदे यांच्या झंझावातामुळे योजनेला मिळाली गती
गेली दोन वर्षे महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने धमाकेदार वर्षे ठरली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली महायुती सरकारने जनहिताचे असंख्य निर्णय धडाधड घेतले आणि त्यांची अंमलबजावणी देखील त्वरेने केली. महाराष्ट्रात रखडलेल्या विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना देखील महायुती सरकारकडून विलक्षण गती देण्यात आली आणि अनेक प्रकल्प महाराष्ट्राच्या सेवेत गेल्या दोन वर्षातच रुजू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवलेला झपाटा आणि धडाका हा प्रकल्पांच्या पूर्ततेचे प्रमुख कारण ठरला. याशिवाय महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या आणि कल्याणाच्या योजना देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्री मंडळांनी आखल्या.
महिला सबलीकरण या विषयाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने विशेष प्राधान्य दिल्याचे दिसून येते. त्या अनुसार मुलींना मोफत उच्च शिक्षण, मुलींना अर्ध्या दरात बस प्रवास, महिलांना प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्णा योजना, अशा योजना सरकारने आखल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली. महिलांना अर्ध्या दरात बस प्रवास देऊनही एसटी महामंडळ नफ्यात आणण्याची किमयादेखील महायुती सरकारने करून दाखवली. पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राबवलेली आणि प्रचंड लोकप्रिय झालेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना होय.

अर्थसंकल्पात घोषणा
21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देणारी योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी या योजनेची घोषणा केली.. अल्पावधीतच या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली. अजूनही या योजनेसाठी नोंदणी सुरू असून निवडणूक काळात पात्र लाभार्थी महिलांना लाभाची रक्कम अदा करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. पण ही योजना सुरू राहणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आव्हाने लीलया पेलली
दीड कोटी महिलांना लाभाचे दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या खात्यात पोहोच करणे हे एक मोठे आव्हान होते .त्याशिवाय प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करणे, पात्र लाभार्थी महिलांची निवड करणे हे देखील खडतर काम होते. परंतु एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला सक्त सूचना देऊन या योजनेची अंमलबजावणी धडाडीने केली. हा हा म्हणता पहिले दोन हप्ते पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा देखील करण्यात आले. निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या संभाव्य अडथळ्याची आधीच दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी एक हप्ता महिलांच्या खात्यात आगाऊ जमा करण्याची तत्परता दाखवली. लाभार्थी महिलांची दिवाळी आनंदाने जावी त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

महिलांकडून सदुपयोग
लाभार्थी महिलांनी प्राप्त झालेल्या रकमेचा सदुपयोग केल्याच्या अनेक घटना चर्चेत आल्या आणि समाज माध्यमावर त्यांनी सकारात्मक चर्चा झाली. एका लाभार्थी महिलेने प्राप्त झालेल्या पैशातून घुंगरांचा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून चांगला लाभ मिळवला. एका लाभार्थी महिलेने प्राप्त झालेल्या पैशातून दोन हांडे विकत घेतले आणि त्यावर "मुख्यमंत्री भावाकडून सप्रेम भेट" असा मजकूर गोंदवून घेतला. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या महिलेशी दूरध्वनीवरून चर्चा केली ज्याची चित्रफित सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
बदनामीच्या हल्ल्याचे आव्हान
या योजनेच्या अंमलबजावणीचे आव्हान जितके कठीण होते त्याहून कठीण होते ते या योजनेची बदनामी करणाऱ्या विरोधकांना रोखणे. पण हे आव्हान देखील एकनाथ शिंदे यांनी लीलया पेलले. महिलावर्गात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे आणि त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढीस लागली आहे हे लक्षात येताच विरोधकांनी या योजनेची बदनामी करण्यास सुरुवात केली. ही योजना दीर्घकाळ चालणार नाही, हा निवडणुकीचा जुमला आहे, सरकार खात्यातील पैसे काढून घेणार आहेत अशा अनेक अफवा या योजनेच्या संदर्भात विरोधकांनी पसरवल्या. परंतु सरकारचा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी या सर्व अफवाबाजीला सडेतोड उत्तर देऊन निरुत्तर करून टाकले . "आमचे सरकार हे देणारे सरकार आहे, घेणारे सरकार नाही" अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली तसेच "पात्र लाभार्थी महिलांना देण्यात आलेली रक्कम ही ओवाळणी आहे आणि दिलेली परत घेतली जात नाही" असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. "पुन्हा सत्तेत आल्यास माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभाची रक्कम वाढविण्यात येईल" अशी घोषणा त्यांनी केली तसेच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमुळे अनेक प्रकल्प रखडले आणि त्यांच्या किमती वाढल्या. ते प्रकल्प वेळेत पूर्ण झाले असते तर महाराष्ट्र शासनाचे पैसे उरले असते आणि त्यातून अधिकची रक्कम पात्र लाभार्थी महिलांना देता आली असती, अशी भूमिका ही एकनाथ शिंदे यांनी घेतली.
ऑनलाईन खोडा घालण्याचा प्रयत्न
तोंडी बदनामी करून या योजनेचे कोणतेही नुकसान करता येणार नाही हे लक्षात येताच विरोधकांनी आपला मोर्चा तांत्रिक बाबींकडे वळवला. काही विरोधकांनी स्वतः महिलांचे कॅम्प लावून त्यांचे चुकीचे अर्ज भरले. या योजनेचा लाभ महिलांना मिळू नये आणि त्यातून सरकारची बदनामी व्हावी हा त्यामागचा उद्देश असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर जंक डाटा टाकून पोर्टल बंद पडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केल्याचा दावा गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. पण सरकारचा प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी वेळीच योग्य पावले उचलली आणि या योजनेचा लाभ ऑफलाईन देण्यासही सुरुवात केली त्यामुळेच महिलांना नियोजित वेळेतच पैसे मिळू शकले. सध्या निवडणूक काळात निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीस मनाई केली आहे. पण सरकारने ही योजना बंद केल्याचा ठणाणा विरोधकांनी सुरू केला आहे. त्यालाही एकनाथ शिंदे यांनी चोख प्रतिउत्तर दिले. महिलांची गैरसोय व्हायचा प्रश्नच नाही, या संकटाच्या माझा आधीच कल्पना होती म्हणून दोन हप्ते एकदम देण्यात आले आहेत असे एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
माझी लाडकी बहीण सारखी प्रचंड मोठी योजना राबवणे आणि पात्र लाभार्थींना वेळेत रक्कम अदा करणे असे खडतर आव्हान एकनाथ शिंदे यांनी पेलले आहे. भविष्यात या योजनेचा आणखी विस्तार करण्याची इच्छाशक्ती त्यांनी दाखवली आहे. महिला वर्गाचा संपूर्ण विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांशी चर्चा केली तेव्हा हजारो लाभार्थींनी शिंदे यांच्या हातात राखी बांधून शिंदे यांचे आभार मानले. लाडकी बहीण योजना आणि एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता किती प्रचंड वाढली आहे हे शिंदे यांच्या भोवती पडणारा महिलांचा गराडा आणि त्यांच्या हातात बांधलेल्या राख्यांची संख्या पाहून लक्षात येते.












Click it and Unblock the Notifications