पश्चिम महाराष्ट्रात नद्यांचा रुद्रावतार ; सांगलीतून कैद्यांना हलविले
सांगली : धो धो कोसळत असलेल्या पावसामुळे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. धरणांचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे खालच्या भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे कृष्ण नदीपात्राच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनही तयारीला लागले आहे. सांगली जिल्हा कारागृहातून ८० कैद्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे.
कृष्णा नदी ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे. पंचगंगा, वारणा, कोयना अशा नद्या कृष्णा नदीला येऊन मिळतात. कृष्ण आणि पंचगंगा नदीचा संगम झाल्यानंतर कृष्णेचे पात्र विराट स्वरूप धारण करते. त्यातच कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग चुकल्यास सांगली आणि लगतच्या परिसराला भीषण पूरपरिस्थितीचा धोका संभवतो. सध्या अशीच परिस्थिती महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर निर्माण झाली आहे.

आणखी कैद्यांना स्थलांतरित करण्याची तयारी
खबरदारीचा उपाय म्हणून सांगली जिल्हा कारागृहात बंदिवान असलेल्या तब्बल ८० कैद्यांना कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात स्थलांतरित करण्यात आले आहे. यात ६० पुरुष आणि २० महिला कैद्यांचा समावेश आहे. यात खतरनाक गुन्हेगारांचा देखील समावेश आहे. कृष्णा नदीपात्रात पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास आणखी कैद्यांना स्थलांतरित करण्याची तयारी कारागृह प्रशासनाने केली आहे. कारागृहातील अन्नधान्य, शस्त्रास्त्रे, दारुगोळा अन्यत्र स्थलांतरित करण्यात आला आहे.
धरण क्षेत्रात पावसाचा जोर ; राधानगरी धरण भरले
धरण क्षेत्रात पावसाचा चांगलाच जोर असून त्यामुळे धरणे भरू लागली आहेत. कोल्हापूर शहराची जीवन वाहिनी मानली जाणारी पंचगंगा नदी गतीने वाढत आहे. राजाराम बंधार्यावर पाणी पातळी ४३ फुटांवर गेली आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक राधानगरी धरण १०० टक्के भरले असून त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे भोगावती नदीत पाण्याचा ओघ वाढला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यामुळे पावसाने उघडीप दिली तरी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाने कोल्हापूर शहर आणि जिल्हा वासियांना खबरदारी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
सतेज पाटील यांचे कर्नाटक सरकारला निवेदन
कर्नाटकात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधण्यात आले आहे. या धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या पूरस्थितीवर मोठा परिणाम करीत असतो. २००५ साली पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरात या धरणाने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सीमाभागातील जनतेचे अलमट्टी धरणाकडे डोळे लागलेले असतात. या संदर्भात कोल्हापूरचे माजी पालकमंत्री आणि कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन कर्नाटक सरकारला निवेदन दिले आहे. त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि अलमट्टी धरणाच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याची विनंती केली आहे.












Click it and Unblock the Notifications