भारताने गमावला आंतरराष्ट्रीय कीर्तीचा खगोलशास्त्रज्ञ, डॉ. जयंत नारळीकर यांचे निधन

प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. भारतीय खगोलशास्त्राला नवे वळण देणारे आणि विज्ञानाला लोकप्रिय करण्यासाठी विशेष योगदान देणारे डॉ. नारळीकर यांचं जाणं हे विज्ञानजगतातील मोठं नुकसान मानलं जात आहे.

विज्ञान आणि साहित्यात समांतर योगदान

केवळ संशोधनापुरते मर्यादित न राहता, त्यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्यही तितक्याच ताकदीनं केलं. रसाळ आणि ओघवत्या शैलीतील त्यांच्या मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानविषयक लेखनामुळे त्यांना वाचकप्रियता लाभली. त्यांनी "चला जाऊ अवकाश सफरीला", "टाइम मशीनची किमया", "व्हायरस" यांसारख्या अनेक कथा आणि "विश्वाची रचना", "विज्ञानाची गरुडझेप" यांसारखी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली.

सशक्त वैज्ञानिक कारकीर्द

डॉ. नारळीकर यांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापूरमध्ये झाला. त्यांचे वडील रँग्लर विष्णू वासुदेव नारळीकर हे गणिततज्ज्ञ, तर आई सुमती नारळीकर या संस्कृतविदुषी होत्या. वाराणसीमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठात उच्च शिक्षण घेतलं आणि बीए, एमए, पीएचडी पदव्या मिळवल्या. त्यांच्या मार्गदर्शक प्रो. फ्रेड हॉईल यांच्यासोबत त्यांनी प्रसिद्ध हॉईल-नारळीकर सिद्धांत मांडला, ज्याने पारंपरिक बिग बँग सिद्धांताला पर्यायी दृष्टिकोन दिला.

1972 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांना भारतात परत बोलावले, आणि त्यानंतर त्यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेत (TIFR) काम सुरु केलं. पुढे त्यांनी आंतरविद्यापीठ खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राची (IUCAA) स्थापना केली, जे आज देशातील अग्रगण्य खगोलशास्त्र संशोधन संस्था आहे.

सन्मान आणि पुरस्कार

डॉ. नारळीकर यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यात प्रमुख आहेत:
पद्मविभूषण (2004)

महाराष्ट्र भूषण (2010)

साहित्य अकादमी पुरस्कार (2014)

एक पर्व संपले

2021 मध्ये नाशिकमध्ये आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवलेले डॉ. नारळीकर हे विज्ञान आणि साहित्याचा अनोखा संगम होते. त्यांच्या निधनामुळे वैज्ञानिक, साहित्यिक, आणि शैक्षणिक क्षेत्रात शोक व्यक्त करण्यात येत आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी त्यांच्या निधनाला "एक युग संपलं" असे वर्णन केले.

डॉ. नारळीकर यांचे योगदान आणि प्रेरणा अखंड स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+