हिंदीच्या सक्तीवरुन महायुती सरकारमध्येच मतभेद; अजित दादांची भूमिका वेगळी अन् शिंदेंचा भाजपला पाठिंबा
Differences in Mahayuti government over Hindi compulsion, Ajit Pawar vs Eknath Shinde : पहिली ते चौथी या वर्गात हिंदी असू नये. इयत्ता पाचवीपासून हिंदी विषय असावा. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता, वाचता यावे, अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे. तर पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या हो ला हो दर्शविला आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणातील हिंदी सक्तीच्या वादावरुन महायुतीमध्येच मतभेद असल्याचे पाहायला मिळत आहे.
काय म्हणाले अजित पवार?
सध्या महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात मोठा वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यावर पवार म्हणाले, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी या वर्गात हिंदी असू नये. पाचवीपासून हिंदी असावी. पहिलीपासून मुलांना मराठी शिकवावे, त्यांना मराठी लिहिता, वाचता यावे. ज्यावेळेस मुले पहिलीपासून मराठी लिहायला वाचायला शिकतात तेव्हा हिंदीही लिहिता वाचता येते फक्त बोलण्यासंदर्भात असेल तर पाचवीपासून हिंदी शिकवली तरी काही हरकत नाही. पाचवीपासून हिंदी सक्ती करावी.

एकनाथ शिंदे म्हणाले मी मराठी सक्तीची केली?
दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले, आमचे मंत्री दादा भुसे अनेकांना भेटत आहेत. हिंदी भाषेवर ज्यांनी आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्याशी सल्लामसलत केली जाईल.
आम्ही हिंदी अनिवार्य शब्द काढला आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. जोरजबरदस्तीने निर्णय घेणार नाही. आम्ही सर्वांशी बोलल्यानंतर यावर निर्णय घेऊ. मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवला, महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली.
विरोधकांवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांच्या काळात माशलकर समितीचा अहवाल स्वीकृत केला. कुठलाही निर्णय लादला जाणार नाही. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हिंदी भाषा सक्तीवर थेट भूमिका घेणे टाळले.
शिंदेंच्या शिवसेनेची होतेय गळचेपी?
अजित पवारांनी थेट भूमिका मांडली असली तरी भाजपमुळे शिवसेना शिंदे गटाची कुठेतरी गळचेपी होत आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
एकनाथ शिंदे यांनी थेट भूमिका मांडणे टाळले असून विरोधकांवरच खापर फोडले आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने मनसेसोबत मैदानात उतरण्याचे ठरवले आहे. 5 मार्च रोजी महायुती सरकारच्या या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत.
5 मार्च रोजी ठाकरे बंधू उतरणार मैदानात
राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. या आधी राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी तर उद्धव ठाकरे यांनी सात जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली होती. दोन्ही ठाकरे बंधू जर मोर्चा काढणार असतील तर एकत्र का नाही? असा प्रश्न त्यामुळे राज्यात विचारला जात होता. त्यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळात हिंदी विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी पोस्ट त्यांनी केली आहे. त्यामुळे हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार हे निश्चित झाले आहे.












Click it and Unblock the Notifications