वोट जिहाद, धर्मयुद्धावरुन फडणवीसांनी ठाकरेंना धूतलं, म्हणाले, हिम्मत असेल तर...
Maharashtra Assembly Election 2024- सज्जाद नोमानी यांच्या व्हिडीओनंतर महाराष्ट्रातलं राजकारण चांगलंच तापलंय. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यावर निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर आक्षेप घेत, टिका केलीय. महाविकास आघाडीकडून मतांचं 'वोट जिहाद' सुरु असून आपल्याला रामराज्य आणायचं असल्यास 'धर्मयुद्ध' करावंच लागेल, असं फडणवीसांनी म्हटलं होतं. फडणवीसांच्या या विधानावर काल उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. धर्मयुद्ध म्हणून फडणवीस दंगलींना प्रोत्साहन देत आहेत असं म्हणत निवडणूक आयोगाने धर्मयुद्ध शब्दावर आक्षेप घ्यावा, अशी भुमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली होती.

फडणवीसांचा ठकरेंवर निशाणा
एक मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांनी ठाकरेंच्या विधानाला जोरदार उत्तर दिलं. फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचा 'धर्मयुद्ध' शब्दावर आक्षेप आहे. मी त्यांना खुलं आव्हान देतो की, माझ्या 'धर्मयुद्ध' शब्दावर तुम्ही आक्षेप घ्याच. निवडणूक आयोगाकडे तक्रार कराच. तुम्हाला आजकाल धर्मयुद्ध शब्द आवडत नसून, जिहाद शब्द आवडतोय, हे मला माहित आहे, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
नोमानींवरुन मविआला धुतलं
फडणवीस पुढे म्हणाले, 2012 ते 2024 या काळात झालेल्या दंगलीत मुस्लिम समुदायावर असणारे गुन्हे मागे घ्या असं सज्जाद नोमानींनी सांगितलं. मविआनं त्यालाही होकार दिलाय. भाजपला मदत करतात त्यांना सोशल बायकॉट करा, असंही नोमानींचं म्हणणं आहे. मग या दंगली नाहीत का..? उद्धव ठाकरे यावर का बोलत नाहीत? असा प्रतिप्रश्न करुन फडणवीसांनी, आता ते हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र राहिलेले नाहीत. ते जनाब बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र झालेले आहेत, असा टोला लगावला. मविआकडून सज्जाद नोमानीचे पाय चाटण्याचं काम सुरु आहे, त्याला आमचा विरोध आहे, असं फडणवीस म्हणाले.
मतांसाठी मविआचं लांगूलचालन
महाविकास आघाडीनं लोकसभेला धार्मिक नेत्यांचा वापर करुन मतांचं धृविकरण केलं. आता विधानसभेलाही तेच काम सुरु आहे. अल्पसंख्याकांमध्ये जिहाद हा शब्द वापरून, त्यांच्या नेत्यांना हाताशी धरलं जात आहे. अशावेळी आमचं कर्तव्य आहे की, इतरांना आम्ही सजग केलं पाहिजे. कारण मूठभर लोकांचे चोचले पुरवून एखादं सरकार निवडून आलं. तर ते सरकार त्यांच्यासाठीच काम करेल. त्यांच्याच इशाऱ्यावर नाचेल, असं म्हणत फडणवीसांनी मविआवर टिका केली.












Click it and Unblock the Notifications