देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार का?
मुंबई : भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची आज (ता. 4 डिसेंबर) रोजी भाजपाकडून गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील हे स्पष्ट झालं आहे. फडणवीस यांच्यासोबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचाही उद्या शपथविधी होईल, अशी माहिती समोर येत आहे.
गेले काही दिवस एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सत्तास्थापनेच्या आणि खातेवाटपाच्या वाटाघाटी सुरू आहेत. एकनाथ शिंदेंनी भाजपकडे गृहखातं आणि आणखी काही महत्त्वाच्या खात्यांची मागणी लावून धरली आहे. तसंच ते उपमुख्यमंत्रिपद स्वीकारायला तयार नव्हते, अशीही चर्चा होती. आता त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

फोटो सौजन्य- पीटीआय
विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात पुन्हा एकदा सत्तास्थापनेचं नाट्य रंगलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला खरा पण त्या बदल्यात त्यांना गृह, महसूल, नगरविकास अशी भरभक्कम खाती हवी आहेत. त्यासाठीच ते कधी त्यांच्या मूळ दरे गावात जाऊन तर कधी वर्षा बंगल्यावर बैठका घेऊन भाजपवर दबाव आणत आहेत. याच घडामोडींच्या दरम्यान ते दोनदा आजारीही पडले आणि चर्चा लांबणीवर गेल्या. अखेर एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी राजी करण्यात आलं, असं कळतं. मात्र खातेवाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही.
विधानसभा निवडणुकीच्या वेळीही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातली अंतर्गत स्पर्धा दिसून आली होती. यात अजितदादांची राष्ट्रवादीही अजिबात मागे नव्हती. लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरून या नेत्यांमधले वाद स्पष्टपणे समोर आले होते. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत तर अजितदादांकडे 41. ही आकडेवारी पाहता अजितदादांपेक्षाही आमचं महत्त्व जास्त आहे, असं एकनाथ शिंदे यांचे समर्थक सांगत आहेत.
निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे भाजपशी वाटाघाटी करत होते, महत्त्वाच्या पदांसाठी दबाव आणत होते तेव्हा अजित पवार यांनी मात्र सत्तास्थापनेसाठी भाजपला पाठिंबा जाहीर करून टाकला. भाजपच्या 132 जागा पाहता भाजपला एकनाथ शिंदे यांची तेवढी गरज नाही, असं चित्र निर्माण झालं. पण भाजपला आणि महायुतीला एवढ्या जागा आमच्यामुळे मिळाल्या, असा एकनाथ शिंदे गटाचा दावा आहे. भाजपला एवढा आत्मविश्वास होता तर त्यांनी स्वबळावर लढायचं होतं, असं आव्हान एकनाथ शिंदेंचे समर्थक देत आहेत. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मुख्यमंत्रिपद, गृहखातं आणि नगरविकास यांच्यावर दावा सांगत आहेत.
एकनाथ शिंदे यांची सत्तास्थापनेसाठी गरज नसली तरी भाजपला एकनाथ शिंदे यांची शिवसेना हवी आहे, असं ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांना वाटतं. एकनाथ शिंदे यांचे संसदेत 7 खासदार आहेत. तिथे भाजपकडे बहुमत नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा पाठिंबा त्यांना महत्त्वाचा आहे, असं सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे. त्याबरोबरच मुंबई आणि नाशिक यासारख्या महापालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे भाजपच्या मदतीला येतील, असंही भाजपचं गणित आहे, असं सुधीर सूर्यवंशी सांगतात.
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्या मते, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे तथाकथित उच्चवर्गातले चेहरे आहेत. त्याचवेळी एकनाथ शिंदे मात्र सामान्य माणसांचं प्रतिनिधित्व करतात. CM म्हणजे काॅमन मॅन, असं एकनाथ शिंदे यांनीच पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे मराठा जातीचे असल्याने बहुसंख्य मराठा लोकांचे ते प्रतिनिधी आहेत. त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावंच लागेल, असं प्रशांत दीक्षित यांना वाटतं. भाजपला उद्धव ठाकरेंना शह द्यायचा असेल तर एकनाथ शिंदे यांना दुखवून चालणार नाही हेही ते नमूद करतात.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री स्वत:कडे नगरविकास खातं ठेवतात, अशी परंपरा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं त्यांच्याकडे होतं. पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं. नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे हे खातं त्यांच्याकडेच राहिलं. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नगरविकास खात्यावरचा दावा कायम ठेवतील, अशी शक्यता आहे. असं असलं तरी महसूल, ऊर्जा, कृषी अशा खात्यांबद्दल नेमका काय निर्णय होतो ते पाहावं लागेल.
एकनाथ शिंदे भाजपशी वाटाघाटी करत असताना अजित पवार यांनीही दिल्ली गाठली. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे नेते होते. पण अजितदादांना अमित शहांची भेट न घेताच मुंबईला परतावं लागलं आहे. त्यामुळे दिल्लीतल्या वाटाघाटींमध्ये ते किती यशस्वी झाले हा प्रश्नच आहे.
या सगळ्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकांच्या सोबत आणि एकनाथ शिंदेंचं या दोघांनीही आव्हान असं चित्र समोर आलं. एकनाथ शिंदे आपल्या विधानसभेच्या जागा आणि संसदेतले खासदार या संख्याबळावर राजकारण करतायत. पण त्याचवेळी नरेंद्र मोदी, अमित शहा या भाजप श्रेष्ठींचाही त्यांना पाठिंबा आहे का? अशाही चर्चा रंगल्या आहेत. आता प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्यामध्ये काय होतं आणि नंतर खातेवाटप कसं होतं यावरून राज्याच्या राजकारणात कुणाची किती ताकद आहे हे कळू शकेल. पण सध्या तरी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे चित्र आता स्पष्ट झालं आहे.












Click it and Unblock the Notifications