फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; मंत्र्यांना 'ही शेवटची संधी', मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्र्याचा क्लास
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे महायुती सरकारची प्रतिमा डागाळली जात असताना, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेत, "आता ही शेवटची संधी आहे, यापुढे अशा चुका खपवून घेतल्या जाणार नाहीत," असा स्पष्ट इशारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंत्र्यांचा 'क्लास' आणि नाराजी
राज्य मंत्रिमंडळाची आज (मंगळवार) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. कृषी, ग्रामविकास, विधी व न्याय विभागासह अनेक महत्त्वाच्या खात्यांसंबंधीचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले. मात्र, या निर्णयांसोदर्भात चर्चा झाल्यावर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुमारे २० मिनिटे सर्वच मंत्र्यांची 'कानउघाडणी' केली. वादग्रस्त विधाने आणि कृतींमुळे सरकारची बदनामी होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
"असे प्रकार पुन्हा घडल्यास सरकारची मोठी बदनामी होते. ही तुम्हाला शेवटची संधी आहे. यापुढे अशा कोणत्याही गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कायदेशीर कारवाई करण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही," अशा शब्दांत फडणवीस यांनी मंत्र्यांना खडसावले.
वाढत्या वादांची मालिका
गेल्या काही काळापासून महायुती सरकारमधील मंत्री आणि आमदार सातत्याने कोणत्या ना कोणत्या वादात सापडत आहेत. यात प्रामुख्याने दोन प्रकरणे सध्या गाजत आहेत:
- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे: पावसाळी अधिवेशनादरम्यान, विधानमंडळाच्या सभागृहात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन रमी गेम खेळताना दिसले. त्यांचे गेम खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आक्रमक पवित्रा घेतला होता. याआधीही कोकाटे यांनी काही वादग्रस्त विधाने केली होती, ज्यात 'राज्य सरकार भिकारी आहे' असे वक्तव्यही होते.
- सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट: सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या बेडरूममधील एक कथित व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्या खोलीत पैशांनी भरलेली एक बॅग दिसत असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकारामुळेही सरकार बॅकफूटवर आले होते.
या सर्व घडामोडींमुळे जनतेमध्ये सरकारबद्दल नकारात्मक प्रतिमा निर्माण होत असल्याची जाणीव मुख्यमंत्री फडणवीस यांना झाली असून, त्यांनी आता थेट हस्तक्षेप करत मंत्र्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. या इशाऱ्यानंतर तरी मंत्री आपल्या वर्तनात सुधारणा करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications