'आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू बनू नये'; फडणवीसांचा खोचक टोला; शेतकरी रिलीफ पॅकेजला मंजुरी!
Devendra fadnavis slams aditya thackeray : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयांसोबतच अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर भाष्य केले. यात त्यांनी आदित्य ठाकरेंवर देखील निशाणा साधला.
सोमवारी शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन बोगस मतदान होत असल्याचा आरोप केला होता. या आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक शब्दांत टीका केली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
"माझी अशी अपेक्षा होती की आदित्य ठाकरे यांनी 'मी महाराष्ट्राचा पप्पू आहे', असे प्रदर्शन करू नये," असा टोला फडणवीस यांनी लगावला. ते म्हणाले की, राहुल गांधी जसे मोठी स्क्रीन लावून उगीच इकडून तिकडे येरझाऱ्या घालतात आणि 'खोदा पहाड और चुहा भी नहीं निकला' अशा पद्धतीचे वक्तव्य करतात, दुर्दैवाने तेच काल आदित्य ठाकरेंनी केले, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. त्यांनी स्पष्ट केले की, आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या आरोपांची उत्तरे निवडणूक आयोगाने यापूर्वीच दिली आहेत.
शेतकऱ्यांसाठी ११ हजार कोटींचा मोठा निधी मंजूर
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रिलीफ पॅकेज (मदत निधी) संदर्भात मोठा निर्णय जाहीर केला. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रिलीफ पॅकेजचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
आतापर्यंतची मदत
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आतापर्यंत ८ हजार कोटी रुपये निधी शेतकऱ्यांसाठी 'रिलीज' करण्यात आला आहे आणि जवळपास ४० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा झाले आहेत. आजच्या बैठकीत अजून ११ हजार कोटी रुपयांच्या निधीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. हे अतिरिक्त ११ हजार कोटी रुपये पुढील १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पोहोचवण्याचे स्पष्ट आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
हमीभावानुसार शेतमाल खरेदीवर मार्गदर्शन!
शेतमालाच्या खरेदी संदर्भात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे आवाहन केले. सध्या शेतमालाच्या खरेदीची प्रक्रिया सुरू असून, राज्यभर नोंदणी सुरू करण्यात आली आहे. पूर्वी नोंदणी केली नसल्यामुळे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कमी किमतीत विकत घेऊन तोच माल हमीभावाने शासनाला विकून नफा कमवत होते. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनी शेतकऱ्यांना त्वरित नोंदणी करण्याची विनंती केली आहे.
जर व्यापारी हमी भावाप्रमाणे शेतकऱ्यांचा माल खरेदी करत असतील, तर शेतकऱ्यांनी जरूर व्यापाऱ्याला विकावा. पण जर व्यापारी हमीभावापेक्षा कमी भाव देत असतील, तर शेतकऱ्यांनी नोंदणी करून आपला माल शासनाच्या खरेदी केंद्रांवर विकावा, असेही फडणवीस म्हणाले.












Click it and Unblock the Notifications