"ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, क्रिकेट खेळावं, आम्हाला फरक पडत नाही"; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
राज्यात त्रिभाषा सूत्र आणि शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मोठा वाद रंगला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडत उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. "ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत, यासाठी मी कोणताही जीआर काढलेला नाही," असं सांगत ते म्हणाले की, "ते एकत्र येऊन क्रिकेट खेळावं, जेवावं, त्याचं आम्हाला काहीच सोयरसुतक नाही."

राजकीय भूमिका आणि निर्णय प्रक्रियेवर फडणवीसांचा खुलासा
त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, "राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या हितापेक्षा आम्ही महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं भविष्य जास्त महत्त्वाचं मानतो. निर्णय घेताना आमच्यावर कुणाचाही राजकीय दबाव चालणार नाही. योग्य तेच आणि शैक्षणिकदृष्ट्या फायदेशीर असं धोरणच आम्ही स्वीकारू."
हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंच्या काळातच?
मुख्यमंत्री म्हणाले की, "उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्याच जवळच्या नेत्यांनी हिंदी सक्तीबाबत शिफारस केलेली होती. तीच शिफारस त्यांनी (ठाकरेंनी) मान्य केली होती. त्यामुळे यावर आता टीका करणे म्हणजे राजकारणात दुहेरी भूमिका घेणं आहे. सत्ता असेल तेव्हा वेगळं रूप आणि विरोधात गेल्यावर वेगळी भाषा - हीच यांची शैली आहे," असा थेट आरोप त्यांनी केला.
"भावांच्या एकत्र येण्यावर आमचं काही बंधन नाही"
ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "दोन भावांना एकत्र येऊ नये, असं मी कधी सांगितलंय का? मी काही असा आदेश दिलेला नाही की ते एकत्र यायचं नाही. त्यांनी एकत्र येऊन क्रिकेट खेळावं, टेनिस खेळावं, जेवणावळ करावी यात आम्हाला काहीच अडचण नाही."
त्रिभाषा सूत्रावर समिती निर्णय घेणार
फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, त्रिभाषा धोरणाबाबत एक अधिकृत समिती नेमण्यात आली असून, तिच्या शिफारशीनंतरच सरकार अंतिम निर्णय घेईल. "हे धोरण केवळ राजकीय प्रचारासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी आखलं जाईल," असं त्यांनी ठामपणे सांगितलं.












Click it and Unblock the Notifications