पोलिसांवर हल्ला सहन होणार नाही...त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू; देवेंद्र फडणवीस संतापले
नागपूर प्रकरणात पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला त्यांना कबरीतून बाहेर शोधून काढू, सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल. पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार त्याशिवाय शांत बसणार नाही असे फडणवीस म्हणाले.
नागपुरात हिंसाचार पसरवण्यास जो कोणी जबाबदार असेल, त्याला सोडले जाऊ नये, अशा सक्त सूचना मी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. नागपूरची शांतता आणि सद्भावना कोणत्याही किंमतीत बिघडू दिली जाणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
काही लोकांनी अफवा पसरवल्याने वातावरण तापलं
कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्यामुळे नागपूरमध्ये हिंसाचार भडकल्याचा आरोप केला जातोय. मात्र, कुराणच्या आयत लिहिलेल्या चादरी जाळल्या गेल्या नाहीत. काही लोकांनी अफवा पसरवल्या, त्यामुळे नागपूरची परिस्थिती बिघडली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली.

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात नागपूरमधील दंगलीच्या घटनांमध्ये 'पूर्वनियोजित पॅटर्न' दिसत असल्याचे म्हणत हा कारस्थानाचा भाग असल्याचे म्हटले होते.
पटोलेंच्या टीकेला फडणवीसांचा टोला
नागपूर प्रकरणात पोलिस आयुक्त आणि मी वेगळे बोललो नाहीत, पोलिस आयुक्तच मला ब्रिफ करतात. नागपूरच्या सीपींनी सांगितले की हे पूर्वनियोजित होते की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळे बोलले आणि मी वेगळे बोललो असे काहीही नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी नमूद केले.
चादरीवर कुराणची 'आयत' लिहिलेली नव्हती
आता नागपूर शांत आहे. नागपूर शांततेसाठीच प्रसिद्ध आहे. 1992 नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येते. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली. त्यांनी नागपूर घटनेचे संपूर्ण कथन केले.












Click it and Unblock the Notifications