अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाट्याला काय? फडणवीसांनी वाचली यादी विरोधकांना दिले हे प्रत्युत्तर
मुंबई : आंध्रप्रदेश आणि बिहारसाठी केंद्र सरकारने खजिना उघडला, त्यांना भरभरुन दिले पण महाराष्ट्राच्या वाट्याला फारसे काही मिळाले नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले याची यादीच वाचली. विरोधकांनी नेरेटीव्ह सेट करु नये असेही ते म्हणाले. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
विरोधकांनी नेरेटीव्ह सेट करु नये
प्रत्येक क्षेत्रात भविष्यातील वृद्धी दिसणारा, संतुलित गुंतवणूक असणारा आणि भविष्याचा वेध घेत अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी भरीव तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विरोधकांनी चुकीचा नरेटिव्ह सेट करू नये, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

मी सांगतो महाराष्ट्राच्या वाट्याला काय?
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ज्या ज्या मागण्या केंद्राकडे केल्या आहेत, त्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत, याची खात्री आहे. अद्याप अर्थसंकल्पाची प्रिंट मिळाली नाही. तरीही अर्थसंकल्प ऐकत असताना जे महाराष्ट्राला मिळाले अंतिम प्रिंट आल्यानंतर महाराष्ट्राच्या वाट्याला नेमके काय आले? हे सांगतो असे म्हणत
फडणवीस यांनी यादीच वाचली.
अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठी तरतूद
फडणवीस म्हणाले, भारताच्या भविष्यावर मोठी गुंतवणूक करणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यात शेतकरी, महिला, युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेवण्यात आले आहे. शेती असेल, रोजगार, आरोग्य, सामाजिक कल्याण यामध्ये मोठी गुंतवणूक झाली आहे. कोविडनंतर जगभरात अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना भारताच्या ताकदीचा अनुभव आता येत आहे.
वर्षाला 17,500 रुपये वाचणार
महागाईचा दर 5.4 टक्के पर्यंत खाली आला आहे. सामाजिक कल्याण योजनाच्या विकासाचा दर 12.8 टक्के आहे. याचा अर्थ या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. वित्तीय तुट कमी होताना दिसत आहे. बँकांचा एनपीए केवळ 2.8 टक्के आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात 40 लाख कोटी रुपये थेट जमा करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे.
ग्रामविकास क्षेत्रात 2 लाख कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक झाली आहे. 3 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार आहेत. आदिवासी बांधवांसाठी जनजातीय ग्रामोन्नती अभियान 63 हजार गावांमध्ये राबवण्यात येणार आहे. आयकरात मोठ्या प्रमाणावर मध्यमवर्गीयांचा फायदा होणार आहे. सुमारे 17,500 रुपयांची वार्षिक बचत होणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, देवेंद्र फडणवीस यांनी वाचली ही यादी
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: 600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: 400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: 466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: 598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: 150 कोटी
- MUTP-3 : 908 कोटी
- मुंबई मेट्रो: 1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: 499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: 150 कोटी
- नागपूर मेट्रो: 683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: 500 कोटी
- पुणे मेट्रो: 814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: 690 कोटी












Click it and Unblock the Notifications