'कोणाचे लग्न लावायचे असेल तर अंबादासजींना फोन लावा; फडणवीसांनी सांगितला 'लव्ह मॅरेज'चा किस्सा, अन्.
Devendra Fadnavis on Ambadas Danve : महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारोप नुकताच विधान परिषदेत पार पडला. या भावनिक प्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीतील विविध पैलूंना उजाळा दिला, त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि काही अविस्मरणीय किस्से सांगून सभागृहात हास्याचे फवारे उडवले.
आंदोलक ते 'लव्ह मॅरेज'चे सूत्रधार
अंबादास दानवे हे विविध प्रश्नांवरून आक्रमक आंदोलने करण्यात नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. विशेषतः, व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मात्र, याच व्हॅलेंटाईन डे विरोधी दानवे यांनी एका आमदाराचे प्रेमविवाह जुळवून दिल्याची गोष्ट फडणवीसांनी सांगितल्यावर सभागृहात एकच हशा पिकला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "अंबादासजी विविध प्रश्नांना घेऊन आंदोलन करत होते. परंतु, एकीकडे व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे अंबादास दानवे यांनी मात्र आमचे सहकारी आमदार संजय केनेकर यांचा प्रेमविवाह लावून दिला."

"कोणाला लग्न लावायचे असेल तर अंबादासजींना फोन लावा!"
यावर बोलताना फडणवीस पुढे म्हणाले की, दानवे यांचा आजही व्हॅलेंटाईन डेला विरोध कायम आहे, पण कोणाचे लग्न लावून द्यायचे असेल, तर अंबादास दानवे यांना फोन करा, ते त्याची व्यवस्था लावून देतील!
फडणवीसांनी हे वाक्य उच्चारताच, सभागृहात उपस्थित सर्व आमदार आणि मान्यवरांमध्ये एकच हास्याचा कल्लोळ माजला. या विनोदाने निरोप समारंभातील वातावरण हलके-फुलके झाले आणि दानवे यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित केले.
या किस्स्यावरून अंबादास दानवे यांची कठोर आंदोलकाची प्रतिमा असली तरी, ते वैयक्तिक पातळीवर मैत्रीपूर्ण आणि मदत करणारे व्यक्तिमत्व आहेत हे दिसून आले. हा निरोप समारंभ केवळ औपचारिकता न राहता, आठवणींना उजाळा देणारा आणि हास्यविनोदाने भरलेला एक अविस्मरणीय प्रसंग ठरला.
उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याचा स्कोप
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धवजी आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे यायचा स्कोप उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू.
अंबादास दानवे कट्टर सावरकरवादी
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्यानविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला ते बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते. हिंदुत्ववाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधानपरिषदेची जागा शिवसेनेला गेली. मग दानवेंना शिवसेनेत जावं लागलं."
फडणवीसांच्या भाषणाचा हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले की, "भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र त्यांनी माझ्याकडून घेतलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल शंका आहे."












Click it and Unblock the Notifications