महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ: फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट 'ऑफर', सभागृहात काय घडलं?
Devendra fadnavis on uddhav thackeray : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. विधान परिषदेत आज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची थेट ऑफर दिली.
या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानपरिषदेच्या सभागृहात बोलताना नेमकं काय घडलं, त्याविषयी जाणून घ्या, खरच उद्धव ठाकरे हे भाजप सोबत जाणार आहेत का, नेमकं सभागृहात घडलं तरी काय, वाचा सविस्तर.!
सभागृहाबाहेरून सभागृहापर्यंतची 'ऑफर'
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या आमदारकीचा शेवटचा दिवस होता. त्यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला येण्यापूर्वी, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची सभागृहाच्या परिसरात अनौपचारिक भेट झाली. या भेटीनंतरच फडणवीसांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंना उद्देशून हे जाहीर विधान केले, ज्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.

"तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप आहे!
भाषणात फडणवीस म्हणाले, "उद्धवजी, आता 2029 पर्यंत काही करायचं नाही. आम्हाला तिकडे (विरोधी पक्षात) यायचा स्कोप उरला नाही. मात्र, तुम्हाला इकडे (सत्तेत) यायचा स्कोप आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू." फडणवीसांच्या या विधानाने भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या संभाव्य युतीबद्दलच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ दिले आहे. या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत.
हे ही वाचा :
अंबादास दानवे : कट्टर सावरकरवादी
यावेळी फडणवीसांनी अंबादास दानवे यांच्या राजकीय कारकिर्दीवर आणि व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश टाकला. ते म्हणाले, "अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत आला आहे. अनिल परब, तुम्ही आता तयारी करा. दानवे वेगवेगळे योग जुळवून आणतात. हिंदुत्वत्वाची कडवट भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणजे दानवे. भोंग्यांविरोधात त्यांनी अनेक निवेदनं दिली. ते कट्टर सावरकरवादी आहेत. जरी ते बंटी पाटील यांच्या बाजूला बसले असतील तरीही ते सावरकरांचे भक्त आहेत."
फडणवीस पुढे म्हणाले, "अंबादास दानवे हे मूळचे भाजपच्या मुशीत घडलेले कार्यकर्ते. हिंदुत्वत्वाची कडवट भूमिका घेणारे आणि कट्टर सावरकरवादी कार्यकर्ते म्हणजे दानवे. पण जागावाटपात विधान परिषदेची जागा शिवसेनेला गेली आणि मग दानवेंना शिवसेनेत जावं लागलं."
ठाकरेंनी मानले आभार, पण चिमटाही काढला
फडणवीसांच्या भाषणाचा हाच संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. ठाकरे म्हणाले, "भाजपच्या आणि संघाच्या मुशीत घडलेला असा अंबादास दानवे हा कार्यकर्ता आम्हाला दिला याबद्दल मी मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार मानतो. मात्र, त्यांनी (फडणवीस) माझ्याकडून (शिवसेनेतून) घेतलेल्या नेत्यांबद्दल मुख्यमंत्री माझे आभार मानू शकतील की नाही याबद्दल मला शंका आहे." उद्धव ठाकरे यांच्या या खुमासदार वाक्याने सभागृहात पुन्हा एकदा हास्याचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या काळात कोणत्या नवीन राजकीय समीकरणांची शक्यता निर्माण होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.












Click it and Unblock the Notifications