BMC Election 2026: ठाकरेंमध्ये दहशत निर्माण करण्याची क्षमताच नाही; देवेंद्र फडणवीसांचा जळजळीत प्रहार
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला आज सुरुवात झाली असून, राजकारण कमालीचे तापले आहे. मुंबईच्या मैदानात 'ठाकरे विरुद्ध फडणवीस' असा सामना रंगलेला असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. "दहशत निर्माण करण्याची यांची क्षमताच उरली नाही," अशा तुच्छतापूर्ण शब्दांत फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.

'भगवा गार्ड' विरुद्ध मुख्यमंत्री: संघर्षाचा नवा अंक
मुंबईत आज सकाळी ११:३० वाजेपर्यंत १७.५८% मतदानाची नोंद झाली. मात्र, मतदानापेक्षा चर्चा रंगली ती ठाकरे बंधूंनी तैनात केलेल्या 'भगवा गार्ड' ब्रिगेडची.
दुबार मतदान रोखण्यासाठी शिवसेना (UBT) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार 'फिल्डिंग' लावली आहे. अनेक ठिकाणी हे 'भगवा गार्ड' भाजप आमदार आणि पोलिसांशी भिडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
यावर संताप व्यक्त करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मुंबईत जे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना पोलीस जागेवर ठोकून काढतील. कोणीही सामान्य मतदाराला अडवू शकत नाही. दुबार मतदार शोधणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे, रस्त्यावर उतरून राडा करणे ही कोणती पद्धत?"
'सिलेक्टिव्ह दहशत' आणि क्षमतेवर प्रश्नचिन्ह
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे गटाच्या रणनीतीवर सवाल उपस्थित करताना त्यांना त्यांच्या ताकदीची जाणीव करून दिली. ते म्हणाले, हे 'भगवा गार्ड' मालवणी किंवा इतर संवेदनशील भागांत का दिसत नाहीत? त्यांना फक्त विशिष्ट भागांतच भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे का?,
"हे काय दहशत निर्माण करणार? यांची ती क्षमताच आता उरलेली नाही," असे म्हणत फडणवीसांनी ठाकरेंच्या राजकीय अस्तित्वावरच घाला घातला. मतदान कमी व्हावे आणि लोकांमध्ये भीती निर्माण व्हावी, यासाठीच हे सर्व प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
राज ठाकरेंच्या 'शाई' प्रकरणावर टोला
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मतदारांच्या बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचा आरोप केला होता. यावर फडणवीसांनी अत्यंत उपरोधिक उत्तर दिले. फडणवीस म्हणाले की, "निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे, त्यांच्यावर असा संशय घेणे चुकीचे आहे." "जर शाईबद्दल शंका असेल, तर मी म्हणेन निवडणूक आयोगाने थेट 'ऑईल पेंट'चा वापर करावा." "माझ्या हातावरची मार्करची शाई कोणी पुसून दाखवावी," असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंचा दावा फेटाळून लावला.
मतदानाची सद्यस्थिती आणि पोलीस बंदोबस्त
मुंबईतील वाढता तणाव पाहता, पोलिसांनी संवेदनशील मतदान केंद्रांबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला मतदारांची ओळख तपासण्याचा अधिकार नाही.












Click it and Unblock the Notifications