अदानींच्या संपत्तीत वाढ का झाली?, फडणवीसांनी आकडेवारीनिशी राज ठाकरेंना दिले चोख प्रत्युत्तर
Devendra Fadnavis Adani Statement : देशातील उद्योग विश्वातील विस्तार आणि गौतम अदानी यांच्या वाढत्या साम्राज्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अदानी समूहाच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारावर आणि भाजप सरकारच्या भूमिकेवर टीका केली होती. या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्क येथील महायुतीच्या सभेत आकडेवारीचा पाढा वाचत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

राज ठाकरेंचा आरोप काय होता?
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात भाजप सरकारवर निशाणा साधला होता. "२०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर अदानी समूहाने देशभरात मोठ्या प्रमाणावर हातपाय पसरले. महत्त्वाचे प्रकल्प आणि जमिनी फक्त एकाच उद्योग समूहाला का दिल्या जात आहेत? माझा उद्योजकांना विरोध नाही, पण फक्त एकाच उद्योजकाला मोठे करण्याच्या वृत्तीला माझा विरोध आहे," असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते.
देवेंद्र फडणवीसांचे 'डेटा'सह प्रत्युत्तर
राज ठाकरेंच्या या विधानाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मी अदानींचा वकील नाही, राज ठाकरेंच्या टीकेला ते स्वतः उत्तर देतीलच. मात्र, २०१४ नंतर देशात फक्त गौतम अदानींचाच नव्हे, तर अनेक भारतीय उद्योग समूहांचा विकास झाला आहे. त्यांचे उत्पन्न कैकपटीने वाढले आहे."
फडणवीस यांनी भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेचा दाखला दिला. २०१४ मध्ये भारत जगातील ११ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता, जो आता २०२६ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. अर्थव्यवस्था वाढली की उद्योजकही वाढतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोणाचे उत्पन्न किती टक्क्यांनी वाढले?
केवळ अदानीच नाही, तर इतरही अनेक समूहांनी मोदी सरकारच्या काळात प्रचंड प्रगती केल्याचे फडणवीसांनी खालील आकडेवारीद्वारे मांडले:
- उद्योग समूह / कंपनी उत्पन्नातील वाढ (%)
- सन फार्मा : १५५२%
- एव्हेन्यू समूह : (D-Mart) ११६६%
- अदानी समूह : ६८६%
- टाटा समूह : ६६४%
- आदित्य बिर्ला ग्रुप : ५६६%
- HDFC बँक : ३७७%
- हिंदुजा ग्रुप : ३७६%
- इन्फोसिस : २८०%
काँग्रेसशासित राज्यांचा दिला दाखला
राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात अदानींचे प्रकल्प येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, "अनेक काँग्रेसशासित राज्यांमध्येही अदानींचे मोठे प्रकल्प सुरू आहेत. तेथील सरकारे वेडी आहेत का? गुंतवणूक ही अशी गोष्ट आहे की, जर तुम्ही उद्योजकाला नाकारले, तर ते लगेच दुसऱ्या राज्यात किंवा देशात गुंतवणूक करण्यास तयार असतात. त्यामुळे विकासासाठी गुंतवणूक आवश्यक आहे."












Click it and Unblock the Notifications