अजितदादांचं ठरलं, दोन दिवस मंत्रालय आणि पाच दिवस...
मुंबई : महायुतीतील राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक काल मुंबईतील षन्मुखानंद सभागृहात पार पडली. या बैठकीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी अजित पवारांनी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

अजितदादांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आपलं नियोजन सांगून, सगळ्यांनी बाहेर पडण्याचे आवाहन केले. या मेळाव्यात अजितदादांनी सरकारने केलेल्या कामाची उजळणी केली. अर्थसंकल्पातील योजना या फक्त निवडणुकीपुरत्या नाहीत, हे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन, कार्यकर्त्यांना केले. याशिवाय विधानसभेपर्यंत सरकारने केलेली कामं आणि अर्थसंकल्पातील योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायच्या नियोजन करण्याचे सुचवले.
फक्त विकासाचा अजेंडा घेऊन पुढे जायचंय. मला महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करायचंय की लोकांना योजनांचे फॉर्म भरण्यासाठी आणि शक्य ती सर्व मदत करा. महायुतीतील घटक पक्षाचे कार्यालय लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आहे, हा विश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करा, असं अजित पवार म्हणाले.
चुकीच्या नॅरेटिव्हचा घेतला समाचार
अजित पवार म्हणाले, विरोधकांनी चुकीचा नॅरेटिव्ह पसरवल्याने लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. संविधान बदलले जाणार असल्याच्या चुकीच्या नॅरेटिव्हचा निवडणुकीत फटका बसला. पण आता विरोधकांचा हा नॅरेटिव्ह चुकीचा असल्याचं सिद्ध झालंय. विरोधी पक्षांनी कितीही नकारात्मक प्रचार केला, तरी आपला प्रचार सकारात्मक असेल याची काळजी घ्या. तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणुकीला सामोरे जा. पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी ताकतीने लढा, असं आवाहन अजित पवारांनी केलं.
सांगितला स्वतःचा प्लॅन
अधिवेशन संपल्यानंतर मी फक्त दोन दिवस मंत्रालयात थांबणार, उरलेले पाच दिवस महाराष्ट्राभर फिरणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तुम्ही देखील आगामी विधानसभेच्या तयारीला लागा. यामध्ये सगळे मंत्री देखील सहभागी होतील, अशी माहिती त्यांनी कार्यकर्त्यांसमोर दिली. जर राष्ट्रवादीचा मंत्री असेल तर, त्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटावं, पण यासोबतच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील भेटण्यासाठी वेळ राखून ठेवावा. इतर पक्षातील कार्यकर्त्यांच्याही अडचणी आहेत, कामं आहेत. त्याचाही मानसन्मान ठेवायला हवा, अशा सूचाना अजित पवारांनी दिल्या.












Click it and Unblock the Notifications