"मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो,आजही मानतो", अजित पवारांचं मोठं विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या पक्ष फूटीनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मोठी फूट पडली. अजित पवारांनी लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्यापूर्वी आपली वेगळी चूल मांडली. दोन्ही महत्वाच्या निवडणूका अजित पवारांनी महायुती सोबतच लढल्या.
लोकसभा निवडणूकीत मोठा फटका बसल्यानंतर अजित पवारांनी विधानसभा निवडणूकीत लक्ष घातलं आणि पक्षाला घवघवीत यश मिळवून दिलं. मात्र या दोन्ही निवडणूकीत पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद असले तरी एकमेंकाना भेटतात. त्यांच्यात संवाद होतो. तर अनेकवेळा जाहीर कार्यक्रमातून एकमेकांच्या बद्दल टोलेबाजी बघायला मिळते. शरद पवार गट आणि अजित दादांच्या राष्ट्रावादीचे नेते शरद पवारचं आपलं दैवत असल्याचं अनेकवेळा सांगतात. काल पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

"मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो,आजही मानतो"
"मी शरद पवारांना कालही दैवत मानत होतो, आजही मानतो, असं अजित पवारांनी विधान केलं आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या नागरी सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.
आज देशाला मोदींसाहेबांसारखा नेता मिळाला आहे. देशाची मान जगात उंचावत आहे. त्यांच्या पाठीशी कुठेतरी राहायला हवं. म्हणून आपण त्या ठिकाणी निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही निर्णय घेतला तेव्हा काहीजणांचे तळ्यात मळ्यात सुरू होतं, तसं करु नका, तळ्यात मळ्यात न राहता अण्णा कुठे गेला बघा, असं अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना अजित पवारांनी पिंपरी-चिंचवडमधील आपल्या कार्यकाळाचा उल्लेख करत, अनेक महत्त्वाच्या विषयांवर ही भाष्य केलं आहे. ते म्हणाले, "माझ्या हातात हे शहर होतं, महापौर, विरोधी पक्षनेते यांसारखी अनेक जबाबदाऱ्या मी पार पाडल्या. स्वार्थ न पाहता जनतेच्या विकासासाठी काम केली आहेत."
पानटपरी चालवणारे अण्णा आज आमदार झाले
आपल्या भाषणात अजित पवारांनी अण्णा बनसोडे यांच्या प्रवासाचं कौतुक केलं आहे. पवार म्हणाले की "पानटपरी चालवणारे अण्णा आज आमदार, आणि आता विधानसभा उपाध्यक्ष झाले आहेत. त्यांनी कधी हार मानली नाही. 1991 मध्ये मी इथे आलो, तेव्हा गाववाले आणि बाहेरचे अशी चर्चा होती, पण अण्णा आता पूर्णपणे इथलेच झाले आहेत."
आपल्या भाषणादरम्यान अजित पवारांनी जागतिक बाजारपेठेतील चढ-उताराचा उल्लेख केला. "डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफ धोरणामुळे अनेक देशांना फटका बसला आहे. कोविडनंतरचं हे सर्वात मोठं संकट आहे," त्याचा आपला सामना करायचा आहे,पंतप्रधान मोदी यांचे अनेक देशांशी चांगले संबंध आहेत.याचा आपल्याला नक्की फायदा होईल, असा विश्वास ही अजित पवारांनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications