काँग्रेसची महाराष्ट्रद्वेषाची परंपरा जुनीच, नागरिक म्हणतात.."टकमक टोक दाखवणारच"
Congress's tradition of hating Maharashtra is old : महाराष्ट्र आणि दिल्ली यांचे नाते 2014 पर्यंत विळा भोपळ्याचे राहिलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, पेशवाई, यशवंतराव चव्हाण, शरद पवार या सगळ्यांच्या कालखंडात दिल्लीने महाराष्ट्राला नेहमी पाण्यात पाहिले. आणि त्यामुळेच महाराष्ट्रातील सत्ताधार्यांच्या पायात साखळदंड घालायचे हा खाक्या दिल्लीच्या नेतृत्वाने कायम ठेवला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाला विचार दिला. पण तो विचार स्वतःच्या विचारसरणीच्या आणि इकोसिस्टीमच्या आड येत आहे हे बघताच सत्तर वर्षे सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने तो विचार दाबून टाकण्याचा, चिरडून टाकण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.

नेहरूंनी केला छत्रपती शिवरायांचा अवमान
भारताचे सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा गौरव केला जातो. त्यांनी "डिस्कवरी ऑफ इंडिया" नावाचा मोठा ग्रंथ लिहिला. त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे केलेले वर्णन काँग्रेसच्या विचारसरणीचे दर्शन घडवणारे आहे.
"शिवाजी हा वाट चुकलेला देशभक्त होता" असे ते आपल्या पुस्तकात म्हणतात. अर्थात त्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला आणि रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे नेहरू प्रेमी त्यात सर्वात पुढे उभे राहिले आणि त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचा रोष कमी केला, हे इतिहास विसरलेला नाही.
आंबेडकर, सावरकर यांनाही विरोध
संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोन वेळा लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे काम काँग्रेसनेच केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्व आणि तत्त्वज्ञान कधीही काँग्रेसला पचनी पडले नाही आणि त्यातूनच सावरकरांचा अवमान हेच काँग्रेसचे मुख्य ब्रीद राहिले. काँग्रेसच्या चौथ्या पिढीत राहुल गांधी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करतात ते त्यामुळेच.
महाराष्ट्र ही विचारांची भूमी आहे आणि ती आपल्या कुटुंबवादी विचारसरणीला नेस्त नाबूत करून टाकेल ही भीती काँग्रेसला सदैव वाटत आलेली आहे. म्हणूनच महाराष्ट्राच्या प्रत्येक विचाराचा उपमर्द करायचा हे धोरण काँग्रेसने आजतागायत कायम ठेवले आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा उपमर्द
छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे हे काँग्रेस पक्के जाणून आहे. त्यामुळेच या प्रतीकाचा जाणीवपूर्वक अवमान करण्याचे धोरण काँग्रेसने कायम ठेवले. मध्य प्रदेश मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अत्यंत अवमान कारक स्थितीत काँग्रेसने हटवला.
बागलकोट येथे उभारण्यात आलेला असाच पुतळा कर्नाटक सरकारने हटवला. मंगळूर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसनेच विरोध दर्शवला. कर्नाटक मधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असलेले सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अवमानकारक उद्गार काढले मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई काँग्रेसने अद्याप पर्यंत केलेली नाही. अगदी मुंबई महाराष्ट्राला देण्याच्या विरोधात कोण होते, हे सर्वांना ठाऊक आहे.
महाराष्ट्रातले सूर्याजी पिसाळ
कर्नाटक हे वास्तविक दुसरे राज्य आहे. परंतु महाराष्ट्रात देखील शिवरायांचे द्रोही काही कमी नाहीत. महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत असे विधान करणारे एक माजी मुख्यमंत्री आपण पाहिलेले आहेत. दुर्दैवाने त्याच मुख्यमंत्र्यांची री ओढणारे अनेक मुख्यमंत्री काँग्रेस काळात महाराष्ट्रात निर्माण झाले. याच काँग्रेसच्या मुशीतून बाहेर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांच्या विरोधात अत्यंत अपमानास्पद उद्गार काढले.
विशाळगड किल्ल्यावर उभारण्यात आलेली अतिक्रमणे हटवण्याचा आग्रह संभाजी राजे छत्रपती यांनी धरला होता मात्र जितेंद्र आव्हाड यांनी अतिक्रमणकर्त्या लोकांची बाजू घेतली आणि छत्रपतींच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. "संभाजी राजे यांचे रक्त तपासले पाहिजे" इतकी अवमानास्पद भाषा जितेंद्र आव्हाड यांनी उद्गारली. "औरंगजेब आणि अफजलखान नसते तर शिवाजी महाराजांची ओळख कशी काय निर्माण झाली असती" असा उफराटा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारला.
"शिवाजी महाराज महान असतील तर ते अफजल खान आणि औरंगजेब यांच्यामुळेच "अशी मुक्ताफळे ही जितेंद्र आव्हाड यांनी उच्चारली. आज महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या प्रत्येक किल्ल्यावर अतिक्रमण वाढते आहे. आणि अतिक्रमणाला पाठिंबा देणारे दुसरे तिसरे कोणी नसून महाविकास आघाडीचे नेतेच आहेत. वकफ बोर्ड कुणाच्याही जमिनीवर आपला हक्क सांगू शकते. हा धोका शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडकिल्ल्यानाही आहे. मात्र तरीही वकफ बोर्डाला समर्थन काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्षही देत आहेत.
शरद पवार आणि त्यांची विचारसरणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वोच्च नेते शरद पवार हे छत्रपतींच्या विचाराच्या विरोधात वागणारे नेते म्हणून ओळखले जातात. आज पर्यंत फार कमी वेळा ते रायगडावर गेले आहेत."शिवरायांना जाणता राजा म्हणण्याची काहीही गरज नाही" असे विधान करणारे नेते म्हणजे शरद पवार आहेत. त्यांच्याच तालमीत तयार झालेले आमदार प्रकाश गजभिये हे छत्रपतींच्या वेशभूषेत स्वतःच्या नेत्यांसमोर नतमस्तक झाली.
शिवरायांची भूमिका साकारून स्वतःची राजकीय कारकीर्द घडवणारे अमोल कोल्हे यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध दर्शविला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर रोमँटिक गाणी चित्रित करणारे एकमेव कलाकार अमोल कोल्हे हे आहेत. "विशाल गडावरील दर्ग्यामुळेच शिवरायांच्या कुळाचा उद्धार झाला" अशी मुक्ताफळे उधळणाऱ्या कथित इतिहासकारांना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समर्थन दिले. अफजलखानाचा वध हा शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाचा प्रसंग आहे. मात्र आजही अफजलखान वधाचा देखावा दाखवण्यास सर्वात जास्त विरोध असतो तो महाविकास आघाडीच्या नेत्यांचा.
ठाकरेंचे वारस देखील त्याच माळेचे मणी
सेना प्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे समस्त हिंदुस्थानातील हिंदूंचे प्रमुख नेते. मात्र त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे हे देखील काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विचारसरणीचे गुलाम झाले आहेत. उद्धव गटाचे सध्याचे सर्वोच्च नेते संजय राऊत यांनी औरंगजेब आणि मुघलांची स्तुती करणारी सुमने नुकतीच उधळली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा तो सर्वात मोठा अपमान होता.
सब पंछी एक डाल के
भिवंडी हे महाराष्ट्रातील प्रमुख शहर आहे. मात्र तेथे शिवजयंती मिरवणुकीवर बंदी घालण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. शरद पवार हे 40 वर्षानंतर रायगडावर गेले. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरीही दिल्लीमधील प्रमुख रस्त्यांना औरंगजेबाचे नाव देण्याचे समर्थन फक्त काँग्रेसचे नेते करीत होते. आजही औरंगाबादच्या नामांतराला सर्वाधिक विरोध काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील सर्वात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे मात्र त्या स्मारकाला विरोध करणारा याचिका करता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा सदस्य आहे.
"यांना टकमक टोक दाखवाच"
छत्रपती शिवाजी महाराज यांचा गौरवशाली इतिहास हा काँग्रेस आणि नेहरू यांच्या प्रतिमावर्धनाला सर्वात मोठा अडथळा होता. त्यामुळेच काँग्रेसने छत्रपतींचे सर्वाधिक प्रतिमा हनन केले. शिवरायांचा इतिहास जसाच्या तथा सांगणे शरद पवार यांच्या अल्पसंख्याक अनुनयी राजकारणासाठी धोकादायक होते. म्हणूनच पवारांनी स्वतंत्र संघटना उभारून मूळ शिव विचाराला छेद देणारी भूमिका मांडली.
शिवाजी महाराज या एका नावावर महाराष्ट्रात जवळपास 60 वर्षे राजकारण करणाऱ्या शिवसेनेला जेव्हा मुस्लिम मतांची आवश्यकता भासली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे विचार पुढे सरकवण्यास हातभार लावला. आज शिव विचारांचे खरे शत्रू असतील तर ते काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हेच आहेत. स्वतःचे कुटुंब आणि स्वतःचे नातलग त्याच्यापलीकडे काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांनी कधीही विचार केलेला नाही.
शिवरायांचे राज्य मात्र सामान्य रयतेसाठी होते. रयतेच्या कल्याणापेक्षा कुटुंबाचे कल्याण अधिक श्रेष्ठ आहे हे डोक्यात ठेवून राजकारण करणारे काँग्रेस, शरद पवार आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांनी शिवरायांचा अवमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. शिवद्रोहींना टकमक टोक दाखवणे हि आता महाराष्ट्राच्या जनतेचीच जबाबदारी आहे.












Click it and Unblock the Notifications