मोठी बातमी! अतिवृ्ष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळणार! CM फडणवीस काय म्हणाले? वाचा
CM Fadnavis' statement : महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घासही गेला. अशातच हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
राज्यातील विविध भागात नुकत्याच झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले आहे.

राज्य मंत्रिमंडळाची सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे आज बैठक झाली. या बैठकीच्या सुरवातीला राज्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात निर्देशही दिले आहेत.
मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नुकसान आणि झालेल्या मदतीचे सादरीकरण करत ही माहिती दिली आहे.
कोणत्या जिल्ह्यात किती निधी?
राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करीता तातडीने मदतीकरीता निधी द्यावा अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार 49 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.
- कोकण विभाग - 5 कोटी
- पुणे विभाग - 12 कोटी
- नाशिक विभाग - 5 कोटी
- छत्रपती संभाजी नगर विभाग - 12 कोटी
- अमरावती विभाग - 5 कोटी
- नागपूर विभाग - 10 कोटी
- एकूण - 49 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
खरीप 2025 आणि यापुढील कालावधीकरिता केंद्र सरकार अथवा राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यावयाची भरपाई दर आणि निकष 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहतील. यामुळे एक जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात आल्या आहेत, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.
रस्ते आणि पुल दुरुस्तीचे निर्देश
गेल्या पंधरा दिवसांत ज्या भागात रेड अलर्ट घोषित केला होता तेथील रस्ते आणि पुल दुरुस्ती बाबत विचार केला जावा, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
कुठे किती पाणी साठा?
जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी उजनी धरणाच्या जलाशयात 14.5 टीएमसी पाणी साठा आहे. जायकवाडी धरणात 28 टीएमसी तर गोसीखुर्द धरणात 3.72 टीएमसी पाणीसाठा असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती संभाजी नगर आणि जालन्यात टँकरद्वारे पाणी
राज्यातील पाणी टंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टॅंकरने पुरवठा करण्याच्या गावांच्या संख्येत दोनशेने तर टॅंकरच्या संख्येत 336 ने घट झाली आहे. छत्रपती संभाजी नगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे, असे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले.


Click it and Unblock the Notifications
