छत्रपती शिवाजी महाराजांची शंभर वेळा माफी मागायला तयार: मुख्यमंत्री शिंदे
मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींच्या संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. झालेली घटना दुर्दैवी, मनाला अतिशय दु:ख देणारी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शिवरायांची एकदा नवे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. आम्ही महायुती म्हणून एकत्र काम करत आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा भव्य पुतळा कसा उभा राहील हे पाहिलं पाहिजे.

राजकारण करु नये
राजकारण करण्यास अनेक विषय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आपली सर्वांची अस्मिता आहे. आपले दैवत आहेत. त्यावर कृपया करुन राजकारण करु नका. मी त्यांच्या चरणावर डोके ठेवून एकदा नाही तर शंभर वेळा माफी मागतो. त्यांचा आदर्श ठेऊनच आम्ही राज्याच्या कारभार करत आहोत. त्यामुळे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी विरोधकांना सुबुद्धी द्यावी. त्यांनी या विषयात राजकारण आणू नये, असे एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
भव्य पुतळा उभारणार
एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर कसा उभा राहील, यावर विरोधकांनी सांगितले पाहिजे. किल्ल्याचा परिसर नौदलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसर संरक्षित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी संरक्षित केले जाणार आहे. नौदलास त्या ठिकाणी काम सुरु करायचे आहे.
पुतळ्यासंदर्भात दोन समित्या स्थापन
या संदर्भात काल आम्ही महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नौदलाचे अधिकारीही होते. या बैठकीत दोन जॉईंट कमिट्या केल्या आहेत. एका कमिटीद्वारे पुतळ्याच्या दुर्घटनेची चौकशी आणि कार्यवाही असेल तर दुस-या कमिटीमध्ये तज्ज्ञ तसेच ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनविण्याचा अनुभव ज्यांना आहे असे शिल्पकार, इंजिनिअर, आर्किटेक्ट, आणि नौदलाचे अधिकारी असतील. शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी लवकरात लवकर उभा राहिला पाहिजे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची आणि जनतेची मागणी आहे, आम्ही त्यावर फोकस करत आहोत असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.












Click it and Unblock the Notifications