वाघनखांचा योग्यवेळी वापर करणार! सीएम एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा
मुंबई - "मी मारलेले ओरखडे अनेकदा दिसत नाही आणि ते बसले तर तोंड उघडून सांगताही येत नाही. या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी मारलेले ओरखडे अनेकदा दिसत नाही आणि ते बसले तर तोंड उघडून सांगताही येत नाही. या वाघनखांचा योग्यवेळी योग्य वापर होईल. विरोधी पक्षाला या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. हा राजकीय कार्यक्रम नाही.

छत्रपतींनी वापरलेली वाघनखांचे दर्शन तमाम राज्य, देशातील लाखो शिवभक्त आसुसलेले आहेत पण विरोधी पक्ष अशावेळी बहिष्कार घालतो यापेक्षा दुर्दैव काय. प्रत्येक चांगल्या कामात त्यांनी खोडाच घातलेला आहे.
शिवभक्त विरोधकांना उत्तर देतील
छत्रपती शिवरायांचे मावळे आणि शिवभक्त विरोधकांना काय उत्तर द्यायचे ते देईल. पण छत्रपती शिवरायांची वाघनखं साक्षात आपल्याकडे आली आहेत. शिवाजी महाराजांच्या वास्तव्याचा या ठिकाणी आभास होत आहे. वाघनखं म्हणजे शिवरायांची वीर गाथा आहे. महाराणी ताराबाईच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार राज्य सरकार करणार आहे.
त्यांना वाघनखांची समज काय?
एकनाथ शिंदे म्हणाले, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. हा सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे. शिवरायांची वाघनखे हे शौर्याचे प्रतीक आहे त्याचे दर्शन शिवभक्तांना घेता येणार आहे. तसेच खोट्या वाघांना खऱ्या वाघनखांची काय समज असणार असा टोला शिंदेंनी विरोधकांना लगावला आहे. विरोधकांकडून सातत्याने ही खोटी वाघनखे असल्याची टीका केली जात आहे.
वाघनखांची दिसली झलक
अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची शौर्यगाथा ठरलेले ऐतिहासिक वाघनखांचे आज साताऱ्यात झलक पाहायला मिळाली. या प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. हा आनंदाचा सोहळा याची देही याची डोळा शिवप्रेमींनी पाहीला.
आजपासून प्रदर्शन
छत्रपती शिवरायांची 'वाघनखं' आजपासून साताऱ्यात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट वस्तुसंग्रहालयातून ही वाघनखे महाराष्ट्रात शुक्रवारऐवजी बुधवारीच महाराष्ट्रात पोहोचली. या वाघनखांसह शिवकालीन शस्त्रांचे देखील प्रदर्शन केले जाणार आहे.
हा गौरवाचा दिवस - मुनगंटीवार
मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले, आजचा दिवस हा शिवप्रेमींसाठी गौरवाचा दिवस आहे. अफजलखानाचे उदात्तीकरण महाराष्ट्रात होत होते. अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यात आले. यापुढे छत्रपतींचा राज्याभिषेक हा सरकारी कार्यक्रम होईल, असा निर्णय राज्याच्या अधिवेशनात घेण्यात आला होता. अयोध्येत जे बांधकाम झाले ते महाराष्ट्राच्या लाकडांपासून झाले. शिवरायांची शिवसृष्टी संसद भवनात तयार करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.












Click it and Unblock the Notifications