बांबू घास नही,खास है' म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार
नवी दिल्ली : भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. देशासह महाराष्ट्र राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बरीच लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्य देखील कृषी विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

महाराष्ट्र राज्याने पर्यावरण संरक्षण अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून घेतलेल्या शाश्वत विकासाच्या धोरणाची दखल घेऊन महाराष्ट्र राज्याची निवड करण्यात आली आणि पंधराव्या कृषी नेतृत्व समितीचा 2024 चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान....
पंधराव्या कृषी नेतृत्व समितीच्या 2024 च्या कॉनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
'बांबू घास नही खास है'- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
महाराष्ट्र हा कृषी क्रांतीचा जनक असून कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णय यामुळे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्राने जगातील मानव जात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून बांबू ही विशेष वनस्पती असून बांबू पासून 2000 प्रकारच्या वस्तू तयार होत असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच 'बांबू घास नही खास है' असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. बांबूमुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्नसुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार देखील मानले.
राज्य सरकारने केलेल्या बांबू लागवडीचे केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून कौतुक...
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुमारे दहा हेक्टर जमिनीवर बांबू लागवड केली असून हा क्रांतिकारी निर्णय असल्याचे कौतुक उद्गार केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिह चौहान यांनी काढले.
नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि इतर मान्यवर उपस्थित होते.












Click it and Unblock the Notifications