शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? जयंत पाटलांचा सवाल
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळा दुर्दैवाने कोसळण्याने राज्यभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. आज महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात आंदोलन केलं आहे.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सावंतवाडीत पत्रकार परिषद घेतली. महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून नौदलाकडं बोट दाखविले जात आहे. पण शिल्पकार आपटेचा पत्ता नौदलाला कुणी दिला? असा प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पुढाकारातूनच झालं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात ताशी 45 किमी वेगाने वारे वाहत होते. माझ्या माहितीप्रमाणे ताशी 27-28 किमी वाऱ्याचा वेग होता. जर वाऱ्याचा वेग अधिक असता तर दोन-चार झाडेही पडली असती, पण तसे न होता फक्त पुतळा पडला. याचा अर्थ पुतळ्याचं काम सदोष होते. पुतळ्याचं स्ट्रक्चर कमकुवत होतं, याची चौकशी सरकारनं केली पाहिजे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामातही सरकारने भ्रष्टाचार केला आहे. कोणताही अनुभव नसलेल्या माणसाला केवळ आपला मित्र आहे म्हणून काम देण्यात आलं. त्याने फक्त दीड-दोन फुटाचे पुतळे बनविले होते, त्याला 28 फुटांचा पुतळा बनविण्याचे काम दिलं, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
सरकार मधील मंत्री सांगतात की, वाईटातून काही तरी चांगलं घडेल. मला अशा मंत्र्यांच्या बुद्धीची कीव येते. आता म्हणतात, आम्ही 100 फुटाचा पुतळा उभा करु. अहो, तुम्हाला 28 फुटाचा पुतळा उभारता आला नाही आणि तुम्ही 100 फुटाचं बोलता, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. बांधकाम खात्यातील भ्रष्टाचार आणि अतीघाई केल्यामुळेच पुतळा कोसळला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र सरकार प्रत्येक गोष्टी भ्रष्टाचार करत आहे. त्यांनी उभारलेले अनेक प्रकल्प सदोष आहेत. महाराष्ट्र सरकारला याचं प्रायश्चित होईल. महाराष्ट्रातील जनता हे सहन करणार नाही. केसरकर बरोबर बोलले वाईटातून चांगलं एकच घडेल महाराष्ट्रात याचं सरकार सत्तेतून जाईल. रयतेच राज्य महाराष्ट्रात येईल, असं जयंत पाटील म्हणाले.












Click it and Unblock the Notifications