"सह्याद्रीचा सिंह गर्जतो.." वाचा शिवरायांचे 'हे' 10 अजरामर विचार, जे आजही प्रत्येक मराठी मनात आहेत
Chhatrapati shivaji maharaj famous quotes and-slogans in marathi : "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू..." अशा शब्दांत ज्यांचे वर्णन केले जाते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ पराक्रमाचा नाही, तर तो उत्तुंग विचारांचा वारसा आहे. महाराजांनी आपल्या मावळ्यांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी आणि रयतेचे राज्य स्थापन करण्यासाठी जे शब्द उच्चारले, ते आज शेकडो वर्षांनंतरही प्रत्येकाच्या मुखात आहेत. शिवजयंतीच्या निमित्ताने, जाणून घेऊयात, शिवरायांची अशी १० गाजलेली वाक्ये, जी आजही आपल्याला संकटात लढण्याची प्रेरणा देतात.

शिवाजी महाराजांचे १० प्रेरणादायी विचार
१. स्वराज्याचा संकल्प: "हे राज्य व्हावे, ही तर श्रींची इच्छा!"
हे केवळ एक वाक्य नव्हते, तर तो स्वराज्याचा पाया होता. महाराजांनी हे सांगून स्पष्ट केले की, हे राज्य कोणत्याही एका व्यक्तीच्या स्वार्थासाठी नसून ते जनकल्याणासाठी आणि ईश्वरी कार्यासाठी आहे. यामुळे मावळ्यांमध्ये असा विश्वास निर्माण झाला की आपण जे करत आहोत ते धर्म आणि न्यायाचे कार्य आहे.
२. ध्येय आणि यश: "ध्येय गाठण्यासाठी जिद्द लागते आणि जिद्द असेल तर अशक्य ही शक्य होते."
शून्यातून जग निर्माण करणाऱ्या शिवरायांनी हे शिकवले की, साधनसामग्रीपेक्षा माणसाची आंतरिक 'जिद्द' मोठी असते. जेव्हा मूठभर मावळ्यांनी बलाढ्य मुघल आणि आदिलशाहीला आव्हान दिले, तेव्हा ती केवळ महाराजांच्या जिद्दीचीच ताकद होती.
३. शत्रूवर मात: "शत्रूला नमवण्यासाठी बलापेक्षा बुद्धीचा वापर करणे कधीही श्रेयस्कर ठरते."
महाराजांनी 'गनिमी कावा' ही युद्धनीती जगाला दिली. अफझल खानाचा वध असो किंवा शाहिस्तेखानाची फजिती, त्यांनी प्रत्येक वेळी दाखवून दिले की, सैन्य कितीही मोठे असले तरी बुद्धीचा वापर करून विजय मिळवता येतो. शारीरिक ताकदीपेक्षा बौद्धिक चातुर्य श्रेष्ठ आहे, हाच याचा संदेश आहे.
४. रयतेची काळजी: "रयतेच्या भाजीच्या देठालाही कुणी हात लावता कामा नये."
हे वाक्य शिवरायांच्या शिस्तीचे आणि प्रजेबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे. लष्कर जेव्हा मोहिमेवर जात असे, तेव्हा शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, अशी त्यांची सक्त ताकीद होती. जगाच्या पाठीवर असा हा पहिला राजा होता, ज्याने आपल्या सैन्याला प्रजेच्या हक्कांचा आदर करायला शिकवले.
५. स्वाभिमान: "परका जरी असला तरी जो न्याय देतो तो आपला, आणि आपला असून जो अन्याय करतो तो परका!"
न्यायदानाच्या बाबतीत महाराज अत्यंत कठोर आणि निपक्षपाती होते. स्वतःचा नातेवाईक जरी असला आणि त्याने गुन्हा केला असेल, तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हा त्यांचा नियम होता. 'न्याय' हाच धर्माचा खरा आधार आहे, हे या वाक्यातून स्पष्ट होते.
६. धाडस: "संकटे तर येतच राहणार, पण त्या संकटांवर पाय देऊन पुढे जाणे म्हणजेच पुरुषार्थ."
महाराजांचे संपूर्ण आयुष्य संकटांनी वेढलेले होते. आग्र्याहून सुटका असो किंवा पन्हाळगडाचा वेढा, त्यांनी कधीही हार मानली नाही. संकट पाहून थांबणे नाही, तर त्याला संधी समजून त्यावर मात करणे, हा खरा पुरुषार्थ आहे.
७. स्त्री सन्मान: "परस्त्री ही आपल्याला मातेसमान आहे, तिचा सन्मान राखणे हे प्रत्येक मावळ्याचे कर्तव्य आहे."
कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग असो किंवा इतर कोणतीही लढाई, स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण महाराजांनी दिली. शत्रू पक्षातील स्त्रियांनाही त्यांनी आईप्रमाणे मान देऊन सन्मानाने परत पाठवले. हेच संस्कार आजच्या समाजाला सर्वात जास्त हवे आहेत.
८. संधीबद्दल: "संधीची वाट पाहण्यापेक्षा संधी निर्माण करणे कधीही चांगले."
महाराजांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी किल्ले जिंकले, आरमार उभे केले. स्वतःचे भविष्य स्वतःच्या हाताने कसे घडवावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
९. संघटना आणि मावळे: "ज्यांच्याकडे कतृत्व असते, त्यांनाच नशिबाची साथ मिळते."
महाराजांचा नशिबावर नाही, तर 'कर्तृत्वावर' विश्वास होता. जे कष्टाला कष्टाची जोड देतात आणि पराक्रम गाजवतात, यश त्यांच्याच चरणी लोळण घेते, असा विश्वास त्यांनी आपल्या मावळ्यांमध्ये निर्माण केला.
१०. मृत्यूवर विजय: "आम्ही शिवबांचे मावळे आहोत, आम्हाला मरणाची भीती नाही, भीती वाटते ती फक्त गुलामगिरीची!"
हे वाक्य स्वाभिमानाचे शिखर आहे. मृत्यू पेक्षाही परातंत्र्य आणि गुलामगिरी ही भयानक असते, हे महाराजांनी ओळखले होते. याच विचाराने प्रेरीत होऊन हजारो मावळ्यांनी स्वराज्यासाठी हसत हसत बलिदान दिले.












Click it and Unblock the Notifications