भाजपने 'हा' प्रवेश केला तर मॅटर मोठं आहे हे समजायला हरकत नाही....
Rajendra Janjal bjp entry | छत्रपती संभाजीनगर: शिवसेना (शिंदे गट) छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ (Rajendra Janjal) यांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटात उभी फूट पडल्याचे स्पष्ट होत आहे. जंजाळ यांनी आपली खदखद थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडण्याचा इशारा दिल्यानंतर, आता त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला आहे.

पालकमंत्री शिरसाट यांच्यावर 'डावलण्याचे' गंभीर आरोप
राजेंद्र जंजाळ यांनी माध्यमांशी बोलताना संजय शिरसाट यांच्यावर थेट निशाणा साधला. शिरसाट हे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना बैठकांसाठी जाणीवपूर्वक डावलत आहेत. त्यांच्या मनमानी कारभारामुळे पक्षात गटबाजी वाढली असून, ते पक्षाला बुडवण्याचे काम करत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप जंजाळ यांनी केला आहे.
जंजाळ यांनी स्पष्ट केले की, 'आम्ही स्वाभिमान गहाण ठेवून राजकारण करणार नाही.' शिरसाट यांच्या कार्यपद्धतीमुळे शिल्पा राणी वाडकर यांच्यासारखे जुने कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. या नाराजीमुळे संभाजीनगरमधील शिंदे गटात मोठी राजकीय फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून तातडीने दखल
जंजाळ यांनी आपली व्यथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे मांडण्याचा इशारा दिल्यानंतर, उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली आहे. सूत्रांनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र जंजाळ यांना फोन करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या फोननंतरही जंजाळ आपल्या आरोपांवर ठाम असल्याचे दिसून येते.
यावेळी जंजाळ यांनी एका जुन्या प्रतिस्पर्धी नेत्यावर नाव न घेता टीका करताना, ते नेते एकनाथ शिंदे यांच्यामुळेच आमदार झाले असल्याचे विधान केले. त्यांनी हा टोला अंबादास दानवे यांना लगावला आहे.
भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावरील उघड नाराजी आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही जंजाळ यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयावर चर्चा सुरू झाल्या आहेत.
राजेंद्र जंजाळ हे आगामी काळात भारतीय जनता पक्ष (BJP) मध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. जंजाळ यांच्या समर्थकांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या या राजकारणाला कंटाळून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर शिंदे गटाला हा मोठा धक्का ठरू शकतो.
जंजाळ यांच्या पुढील भूमिकेकडे आणि भाजप प्रवेशाच्या चर्चेवर ते स्वतः काय स्पष्टीकरण देतात याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र हा प्रवेश झालाचं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का मानला जाईल.












Click it and Unblock the Notifications