एक मेसेज आला अन् भुजबळांचा शपथविधी ठरला, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
महाराष्ट्रातील समाजकारण आणि राजकारणाचा खोल अभ्यास असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) हे नेते मागील काही महिन्यांपासून पक्षापासून अलिप्त होते. महायुती सरकारची स्थापना झाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते आणि तेव्हापासून त्यांनी पक्षाच्या कामकाजापासून काहीसे अंतर ठेवले होते.

मात्र, सोमवारी रात्रीच्या सुमारास राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले. छगन भुजबळ यांना अचानक मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली. मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात ते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना अन्न व नागरी पुरवठा खाते सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे, जे सध्या धनंजय मुंडे यांच्या अखत्यारीत आहे.
या घडामोडींमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. खुद्द भुजबळ यांनी सांगितले की, त्यांना फक्त एकच ओळीचा संदेश मिळाला होता - "तुम्हाला मंत्रिमंडळात घेतले जात आहे." या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा भुजबळ यांच्याकडून याआधी कोणतेही संकेत देण्यात आले नव्हते.
राजकारणात तब्बल चार दशके कार्यरत असलेले 77 वर्षीय भुजबळ हे महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या घडामोडींचे साक्षीदार राहिले आहेत. डिसेंबरमध्ये महायुती सरकारचा शपथविधी झाला, त्यावेळी त्यांना डावलण्यात आल्याने अनेकांमध्ये नाराजी होती. त्यानंतर त्यांनी थेटपणे अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर टीका केली होती. तरीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संयमाचे धोरण ठेवले.
भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील पुनर्स्थापनेमागे ओबीसी मतदारांचे राजकीय समीकरण असल्याची चर्चा आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, त्यांना दूर ठेवणे पक्षासाठी जोखमीचे ठरू शकले असते. त्यामुळे वेळेत घेतलेला हा निर्णय महायुतीसाठी रणनीतिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
ओबीसी मतदारांची मनधरणी
महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, ओबीसी मतदारांची साथ टिकवण्यासाठी महायुती आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एक महत्त्वाची राजकीय चाल खेळल्याची चर्चा आहे. सत्तास्थापनाच्या वेळी ओबीसी नेतृत्वाचे प्रतिनिधित्व करणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात होते, परंतु त्यांचा राजीनामा आल्यानंतर हा वर्ग मंत्रिमंडळात प्रतिनिधित्वाविना राहिला होता.
आता त्याच रिक्त जागेवर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश करून, ओबीसी समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न झाला आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भुजबळांनी सोमवारी रात्रीच त्यांच्या काही जवळच्या कार्यकर्त्यांना नाशिकहून मुंबईत बोलावल्याची माहिती मिळत आहे, ज्यावरून त्यांच्या पुनरागमनाची तयारी आधीपासूनच सुरू झाल्याचे संकेत मिळतात.
मुंडेंच्या खात्याची जबाबदारी भुजबळांकडे?
धनंजय मुंडेंनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी सांभाळलेले अन्न व नागरी पुरवठा खाते सध्या रिक्त आहे. हेच खाते आता छगन भुजबळांकडे सोपवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अनुभव लक्षात घेता, हे खाते त्यांच्याकडे दिले जाणे राजकीय दृष्टिकोनातूनही योग्य मानले जात आहे.












Click it and Unblock the Notifications