छगन भुजबळ पोहोचले फडणवीसांच्या भेटीला; राजकारणात बाँम्ब पडणार..?
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज असल्याचे दिसले आहे. काल मुंबईत त्यांनी थेट अजित पवारांना प्रश्न विचारले. छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडण्याची चर्चा वाढली आहे. भुजबळांनी नाराजी व्यक्त केल्यानंतरही अजित पवार गटाकडून त्यांची समजूत काढण्यात आली नव्हती. आता छगन भुजबळ थेट सागर बंगल्यावर पोहोचल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत.

छगन भुजबळ नाराज
मंत्रिमंडळ विस्तारात भुजबळांना डावलले गेले. त्यानंतर त्यांनी आपली नाराजी प्रसार माध्यमांसमोर स्पष्टपणे मांडली. अजित पवारांना त्यांनी थेट प्रश्न विचारल्यानंतर आता भुजबळ अजित पवारांची साथ सोडण्याच्या चर्चा वाढल्या. भुजबळांच्या नाराजीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना समजावले नाही. सध्या भुजबळ त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करत आहेत. ओबीसी नेत्यांच्या राज्यभर बैठक घेत आहेत. ते लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
भुजबळ फडणवीसांच्या भेटीला
छगन भुजबळ दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. काल त्यांनी मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भुजबळ सागर बंगल्यावर पोहोचले. तेथे भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीस व भुजबळ यांच्यात सुमारे अर्ध्या तासापासून बैठक सुरु आहे. नाराज भुजबळ भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या भेटीला आल्याने राजकारणात चर्चा सुरु झाल्या आहेत.
अवहेलना झाल्याचा आरोप
भुजबळांनी काल स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. ते म्हणाले होते, "मला मंत्रिपद कोणी नाकारलं, हेच शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक पक्षाचा निर्णय पक्षाचा प्रमुख घेत असतो. जसे भाजपचा निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, शिवसेनेचा निर्णय एकनाथ शिंदे घेतात. त्याप्रमाणे आमच्या गटाचा निर्णय अजित पवार घेतात. प्रत्येकाला मंत्रिपद हवं असते. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, पण ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली, त्याबद्दल नाराजी आहे.", असेही छगन भुजबळ यांनी सांगितले होते.












Click it and Unblock the Notifications