एकनाथ शिंदेंना वापरून बाजूला केलं, भुजबळांच्या शपथविधीवरून जरांगेंनी फडणवीसांना घेरलं
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. मराठा आरक्षण चळवळीचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे-पाटील यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

जरांगे म्हणाले, "भुजबळांनी शपथ घेतली की नाही, हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांना मंत्रीपद मिळाल्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही. मात्र, अजित पवार जातीयवादी लोकांना पोसण्याचं काम करत आहेत आणि त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल," असा इशारा त्यांनी दिला.
"मराठ्यांच्या विरोधकांना मंत्रीपद?" - संतप्त प्रतिक्रिया
"जो व्यक्ती मराठा आरक्षणाला विरोध करतो, त्यालाच मंत्रिपद दिलं जातं, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे," असं मत जरांगे-पाटलांनी स्पष्टपणे मांडलं. त्यांनी सांगितलं की, "जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जवळ आल्याने भुजबळांना तात्पुरता गोडवा दिला गेला असावा - चॉकलेटसारखा! पण त्यांच्या आनंदावर लवकरच विरजण पडेल, असंही जरांगे म्हणाले.
जरांगे-पाटलांनी छगन भुजबळांवर "जातीयवादी" असल्याचा आरोप करत, "अशा नेत्यांना मंत्रीपद दिलं जाऊ नये, यासाठी अजित पवारांच्या आमदारांनीच विरोध केला पाहिजे होता," असं ठणकावून सांगितलं.
"हा सगळा डाव फडणवीसांचा असू शकतो"
जरांगे-पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही घणाघाती टीका केली. "मराठा समाजाला संपवण्याचा विडा फडणवीसांनी उचलला आहे. एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांना प्रवाहात आणलं आणि नंतर त्यांनाच फडणवीसांनी बाजूला सारलं. फडणवीस म्हणजे काम झालं की वापरून फेकून देणारा नेता आहे," अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "छगन भुजबळांना मंत्रिपद मिळणं, हा फडणवीसांचा राजकीय डाव असू शकतो. अजित पवार यांचं यामध्ये केवळ माध्यम म्हणून वापर होत आहे."
या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जातीय समीकरणं आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश आणि मनोज जरांगे यांची थेट टीका यामुळे आगामी काळात नवे वादंग उद्भवण्याची चिन्हं आहेत.
ज्याचा शेवट चांगला, त्याचं सगळंच चांगलं" - छगन भुजबळ
मंत्रिपदाबाबत निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांनी सकारात्मक आणि मिश्कील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंग्रजीतून म्हटलं, "ऑल इज वेल वेअर एन्ड इज वेल", म्हणजेच "ज्याचा शेवट चांगला, त्याचं सर्व काही चांगलं मानावं."
भुजबळांनी स्पष्ट केलं की, "मंत्रिपदाबाबतचा निर्णय आठ दिवसांपूर्वीच एका बैठकीत झाला होता. सुरुवातीला सोमवारी शपथविधी होण्याचे नियोजन होतं, मात्र अनेक मंत्री आणि नेत्यांची उपस्थिती मंगळवारी सहज शक्य असल्यामुळे हा दिवस निश्चित करण्यात आला."
त्यांच्या या विधानातून स्पष्ट होतं की, भुजबळ आता मंत्रिमंडळात पुनरागमनाच्या तयारीत असून, राजकीय समतोल राखत आपली भूमिका स्पष्ट करत आहेत.












Click it and Unblock the Notifications