राजकोटच्या किल्ल्यावर महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
सिंधुदुर्ग : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपाच्या कार्यकर्तेमध्ये बाचाबाची झाली आहे. सध्या किल्यावर तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. भाजपाचे नेते नारायण राणे किल्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. दुसरीकडे आदित्य ठाकरे किल्यावर दाखल झाल्यानंतर दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. पोलिसांनी यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना रोखलं ठेवलं. मात्र काही वेळाने दोन्ही कार्यकर्ते पुन्हा एकदा भिडले.
पोलिसांनी या ठिकाणी बॅरीकेटींग केले.दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला तसेच दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केले. भाजपचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर आता विरोधक आक्रमक झाले आहेत.

आदित्य ठाकरे यांनी राजकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "माझ्याकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत. पुतळ्यात भाजपावाले चोरी, भ्रष्टाचार करु शकतात हे आमच्या आकलनाच्या बाहेर आहे, तरी त्यांनी करुन दाखवलं आहे. जे झालं आहे ते व्हायलाच नको होतं. जगात समुद्रकिनारी असणारे अनेक पुतळे आहेत. ते आपटे कुठे आहेत? त्याला कोणी पळून जायला मदत केली आहे का? याची उत्तरं मिळायला हवीत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल केला आहे का?" असा प्रश्न ही उपस्थित केला.
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, "हे फार दुर्देवी आणि बालिशपणाचं आहे. एका कॅमेऱ्यामनला धक्काबुक्की झाली आणि त्यातून सुरुवात झाली. मी कार्यकर्त्यांना महाराजांच्या किल्ल्यात राजकारण करायचं नाही सांगत अडवलं आहे. या बालिशपणात मला जायचं नाही. त्यांची हीच शिकवण आहे. उंचीप्रमाणे त्यांची बालबुद्धी आहे".
"आम्ही येथे नीट येत होतो. ही काय लढाई करण्याची जागा आहे. ही बालबुद्धी किती दिवस सहन करायची. माझ्यावर हल्ला करण्याचा 100 टक्के हेतू होता. कारण ते मला घाबरतात. पण माझ्या खिशात कोंबड्या नाहीत," असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
आज महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून नेते मालवणमध्ये धडक मोर्चा काढण्यात आला असून, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर निषेध केला जात आहे. मालवण तहसील कार्यालयाबाहेर मविआच्या नेत्यांकडून मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात जयंत पाटील, विजय वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंसह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.












Click it and Unblock the Notifications