फायरब्रॅण्ड नेता फायर राहणार की फ्लाँवर होणार? संजय शिरसाट चौथ्यांदा लढणार राजू शिंदे खैरेंचे आव्हान
Sanjay Shirsat Vs Raju Shinde Maharashtra Assembly Election 2024 : शिंदे गटाचे फायरब्रँण्ड नेते असलेल्या संजय शिरसाटांचा मतदारसंघ म्हणून छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ कायम चर्चेत असतो. गेल्या 15 वर्षांपासून शिरसाटांनी या मतदारसंघावर आपली पकड कायम ठेवली आहे. गेल्यावेळी चौरंगी लढतीचा फायदा घेत शिरसाटांनी तब्बल 40 हजारांपेक्षा जास्तीच्या लीडने या मतदारसंघात हॅट्ट्रीक साधली होती. काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याचाही फायदा शिरसाटांनी घेतला होता.
गेल्यावेळी येथून मात खाल्लेले एमआयएम, वंचित हे पक्ष यावेळी पूर्ण तयारीने लढण्याची शक्यता आहे. शिवाय गेल्यावेळी अपक्ष लढून दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेले राजू शिंदे यावेळी ठाकरे गटात गेले आहेत. या मतदारसंघात यावेळी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. गेल्यावेळीपेक्षा यावेळी ही निवडणूक जास्त रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे.

चौरंगी लढतीत शिरसाटांची हॅट्ट्ट्रीक
स्वच्छ प्रतिमा व आक्रमक चेहरा म्हणून संजय शिरसाटांनी पश्चिममध्ये गेल्यावेळी हॅट्ट्रीक साधली. अपक्ष राजू शिंदे, एमआयएमचे अरुण बोर्डे, वंचित बहुजन आघाडीचे संदीप शिरसाट असे तीन प्रमुख उमेदवार असूनही शिरसाटांनी 83 हजारांपेक्षा जास्त मते त्यावेळी घेतली.
शिवाजीनगर, सातारा, देवळाई, छावणी, गारखेडा, शाहनूरमिया दर्गा, पोद्दार हायस्कूल, कडा कार्यालय आदी परिसरात शिवसेनेचे गेल्या अनेक वर्षांपासूनचे प्राबल्य आहे. मात्र तरीही एमआयएम व वंचित बहुजन आघाडीने येथे चांगला जम बसविलेला आहे. मुस्लिम व दलित मतांच्या ध्रुविकरणाचा फायदा गेल्यावेळी शिरसाटांनी घेतला. भाजपमधून बंडखोरी करुन अपक्ष लढलेले राजू शिंदे यांचेही चौरंगी लढतीमुळे नुकसान झाले. यावेळी मात्र शिरसाटांसाठी निवडणूक सोप्पी नसणार आहे.
राजू शिंदेंचा प्रवेश- खैरेंची नाराजी
संभाजीनगर पश्चिम विधानसभेसाठी माजी खा. चंद्रकांत खैरे यांना तिकीट द्यावे, अशी मागणी त्यांचे समर्थक गेल्या कित्येक दिवसांपासून करत होते. मात्र गेल्यावेळी अपक्ष लढलेल्या भाजपच्या माजी महापौर राजू शिंदे यांनी नुकताच ठाकरे गटात प्रवेश केला. हा प्रवेश आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवनच केलेला असल्यान राजू शिंदे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी निश्चित समजली जाते. मात्र शिंदे यांच्या प्रवेशानंतर खैरे समर्थक नाराज असल्याचे दिसते. त्याऊलट पक्षाने अजून तिकीट दिलेले नसून आपल्याला आदेश दिला तर आपणही रिंगणात उतरु असा सूचक इशारा, खैरेंनी दिल्याने शिंदे समर्थकांमध्येही धाकधूक आहेच.

कशी असतील मतदारसंघाची गणिते
या मतदारसंघात दलित व मुस्लिम समाजाची लोकसंख्या लक्षणिय आहे. शिवाय एमआयएम व वंचितचीही येथे चांगली ताकद आहे. यावेळी उमेदवार निश्चित नसला तरी, हे दोन्ही पक्ष येथून लढण्याच्या तयारी आहेत. भाजपमध्ये असलेल्या राजू शिंदे यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने, खैरेंच्या कार्यकर्त्यांना आता शिंदेंच्या कार्यकर्त्यांची जोड मिळणार आहे.
म्हणजेच या मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे. त्याऊलट भाजपचीही येथे चांगली ताकद आहे. शिवाय गेल्या 15 वर्षांपासून शिरसाटांनी एकसंघ ठेवलेले कट्टर शिवसैनिकही येथे आहेत. भाजप व अजितदादा गटाल एकत्र करण्याचे कसब शिरसाटांना जमले तर, महायुतीला चौथ्यांदा विजयाची संधी आहे.

काय आहेत मतदारसंघाचे प्रश्न?
या मतदारसंघात पाण्याचा प्रश्न भीषण आहे. येथे पाच दिवसानंतर पाणी येते. संजय शिरसाट 15 वर्षे आमदार असूनही या भागातील पाणीप्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे मोठी नाराजी आहे. संजय शिरसाटांच्या प्रयत्नातून 1680 कोटी रुपयांची समांतर जलवाहिनी योजनेचे काम सुरु आहे, मात्र ते पूर्ण झाले नाही. दिरंगाईमुळे या योजनेचा फक्त खर्च वाढला, प्रत्यक्षात पाणी कधी येणार, हे सांगता येत नाही. त्यामुळे या भागातील स्थानिक मतदार नाराज आहेत. त्याशिवाय शहरालगतचा भाग असल्याने येथे गुंठेवारीचा प्रश्नही जटील आहे.
गुंठेवारी रद्द करावी, अशी या भागातील जनतेची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी आहे. पाण्याबरोबरच या मतदारसंघात रस्त्यांची मोठी समस्या आहे. रस्त्यांवरूनही अनेकदा राजकारण होते. पावसाळ्यात येथील अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य दिसते. हे सगळे प्रश्न या निवडणुकीत शिरसाटांना जड जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.












Click it and Unblock the Notifications