चाळीसगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; दावोसमध्ये 15,000 कोटींच्या महाप्रकल्पाचा सामंजस्य करार
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) 2026 च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोस येथे चाळीसगाव तालुक्यासाठी तब्बल 15,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील 'ACTUAL HQ' या कंपनीसोबत हा करार झाला असून, यामुळे चाळीसगावच्या औद्योगिक विकासाला जागतिक ओळख मिळणार आहे.

शाश्वत विमान इंधन (SAF) प्रकल्पाची निर्मिती या करारांतर्गत चाळीसगावमध्ये 'सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल' (SAF) म्हणजेच विमानांसाठी लागणारे हरित इंधन तयार करण्याचा महाप्रकल्प उभारला जाणार आहे. हा प्रकल्प ऊस, मका, कापूस, बांबू आणि शेतीतील टाकाऊ अवशेषांपासून इंधन निर्मिती करेल. हा देशातील अशा प्रकारचा मोजक्या आणि जागतिक दर्जाच्या प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार, तरुणांना मिळणार मोठ्या संधी आमदार मंगेश चव्हाण यांनी या प्रकल्पासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने पाठपुरावा केला होता. या प्रकल्पाचा थेट फायदा स्थानिक शेतकऱ्यांना होणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत (FPO) शेतकऱ्यांकडून दीर्घकालीन कराराने कृषी अवशेष खरेदी केले जातील, ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नाला नवे स्थैर्य मिळेल. तसेच, या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष स्वरूपात 3,000 पेक्षा जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, तर वाहतूक आणि सेवा क्षेत्रात हजारो अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
चाळीसगावची भौगोलिक अनुकूलता ठरली निर्णायक मुंबई-आग्रा महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे चाळीसगावची लॉजिस्टिक क्षमता अत्यंत मजबूत आहे. याच अनुकूलतेमुळे ACTUAL HQ, Sankla Renewables आणि SCUBE Infra यांनी या महाप्रकल्पासाठी चाळीसगावची निवड केली आहे. हा प्रकल्प पूर्णपणे 100% नवीकरणीय ऊर्जेवर आधारित असून पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.
विकासाच्या प्रवासातील सुवर्णक्षण या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करताना आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनामुळे चाळीसगावच्या औद्योगिक नकाशावर आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी दिलेले वचन आज पूर्ण होत आहे. चाळीसगावच्या सर्वांगीण विकासाची ही फक्त सुरुवात आहे."
या करारामुळे उत्तर महाराष्ट्राच्या विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती मिळणार असून, जागतिक स्तरावर चाळीसगावची नवी ओळख निर्माण होणार आहे.












Click it and Unblock the Notifications