आता खस्ता खायची गरज नाही! जातप्रमाणपत्र अन् व्हॅलिडीटीही मिळणार सहज, लाखो लोकांना मोठा फायदा!
Caste certificate and validity will be easily available : शिक्षण, नोकरी आणि इतर गोष्टींसाठी आवश्यक असेलेले जातीचे प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र ऐनवेळी न मिळाल्यास शैक्षणिक, नोकरीचे आणि इतर मोठे नुकसान होते, ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र काढताना खाव्या लागणाऱ्या खस्ता आता टळणार आहे, किचकट काम आता सरकारकडून सोपे करण्यात आले असून हा मोठा दिलासा सरकारने दिला आहे.
आधुनिक संगणकीय प्रणाली सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता एकाच टप्प्यात जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र नागरिकांना मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांना होणारा त्रास संपल्यातच जमा आहे. तसेच वेळही वाचत असल्याने हुरहूरही कमी होणार आहे.

कुणाला काढावे लागते जातप्रमाणपत्र
राज्यात सध्या अनुसुचित जमाती- एसटी, अनुसुचित जाती एससी, एनटी- विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय- ओबीसी यांना जातप्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र काढावे लागते. आता या संवर्गातील नागरिकांचा संभाव्य त्रासही कमी होणार आहे.
काय आहे सरकारचा निर्णय?
राज्य सरकारने बार्टी अर्थात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून जातवैधता आणि जात प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रीया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेला देवेंद्र फडणवीस सरकारने तत्वतः मंजुरी दिली आहे. आता आगामी एक महिन्यात या प्रणालीचा वापर होईल.
- प्रणालीचा वापर होईल म्हणजे नेमका काय फायदा होणार?
- जातवैधता आणि जातप्रमाणपत्रांसाठी नागरिकांनी केलेल्या अर्ज प्रक्रीयेसाठी एआयचा वापर होणार आहे. यामध्ये डिजी लाॅकरसारख्या प्लॅटफार्मसह एकत्रित काम केले जाणार आहे.
- अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मुळ पत्ता, वडीलांचे नाव, पतीचे नाव आदी माहिती थेट आधारकार्डशी संलग्न करुन त्याची पडताळणी केली जाणार आहे.
- या प्रक्रीयेमुळे माहितीतील चुकीची नोंद किंवा अर्जसाठीच्या कागदपत्रातील त्रुटी लगेचच दाखवली जाईल, यामुळे अर्जदारालाही तत्काळ समजेल आणि तो चुक दुरुस्त करण्यासाठी लवकरात लवकर योग्य माहिती देऊ शकेल.
अजून काय काय आहे प्रणालीमध्ये समावेश
- एआयशी निगडीत प्रणालीत इंटरफेस उपलब्ध असेल याद्वारे अर्जदाराला आपल्या अर्जातील त्रुटी आणि कागदपत्रांची कमतरता लगेच समजेल.
- अर्ज करताना एकच अर्ज आणि एकच प्रक्रिया असेल त्याद्वारेच प्रमाणपत्र वितरीत केले जाईल.
- ही प्रक्रीया संपुर्णपणे पारदर्शक राहील आणि दलाल अथवा एजंटांचे काम संपेल तसेच त्यांच्याकडून होणारी संभाव्य फसवणूक टळेल.












Click it and Unblock the Notifications