पोलिसांवर वादग्रस्त विधान, संजय गायकवाडांवर फडणवीसांची वक्रदृष्टी; गुन्हा दाखल होताच माफी मागितली!
Devendra Fadnavis on Shiv Sena MLA Sanjay Gaikwad : महाराष्ट्र पोलिसांवर वादग्रस्त विधान करणारे शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय गायकवाड यांचे कान टोचले होते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी देखील त्यांनी दिली होती.
चला तर जाणून घेऊया, आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी काय टीका केली होती. अन् देवेंद्र फडणवीसांनी त्याचे कान कसे टोचले, वाचा संपूर्ण वाद!

वादग्रस्त विधानामुळे संजय गायकवाड कायम चर्चेत
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे कायमच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. कधी ते उद्धव ठाकरेंविषयी बोलतात. तर कधी ते त्यांच्याच जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका करतात. तर मारहाणीच्या प्रकरणात देखील त्यांची नेमही चर्चा असते. अशातच शिवसेना आमदार गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर देखील वादग्रस्त विधान केले. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा चांगलाच समाचार घेतला. अखेर संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले?
शिवसेना शिंदे गटाचे बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्र पोलिसांसारखे अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. तसेच पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात, असा गंभीर स्वरुपाचा आरोपही त्यांनी केला.
संजय गायकवाड म्हणाले की, सरकारने जर एखादा कायदा बनवला तर पोलिसांना एक हप्ता वाढून जातो. गुटखाबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, दारूबंदी केली की पोलिसांचा एक हप्ता वाढतो, जर पोलिसांनी ठरवले की, एक वर्ष मी हरामीपणा करणार नाही, तर सगळे सुतासारखे सुरळीत होईल, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले. पत्रकार परिषदेत केले होते वादग्रस्त विधान?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाच्या 'आभार यात्रे' साठी रविवार 27 रोजी बुलढाणा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आमदार गायकवाड यांनी शुक्रवारी त्यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस खात्याविषयी अपशब्दाची मुक्ताफळे उधळली होती. त्यानंतर महायुतीतील नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कान टोचले होते.
बुलढाण्यातील दोन पोलिस चोरांचे सरदार
पत्रकारांनी अर्जून खोतकर तसेच संजय गायकवाड यांच्या मुलाला जीवे मारण्याच्या धमकीबद्दल विचारले. त्यावर बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, माझ्या मुलापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना संजय गायकवाड नावाच्या पहाडाला पार करावे लागेल. पोलिस काहीही करू शकत नाहीत. माझ्या घरासमोर माझी गाडी जळाली, त्या प्रकरणाचा कुठेही तपास झालेला नाही. त्यामुळे पोलिस हे अकार्यक्षम असून बुलढाण्यातील दोन पोलिस हे चोरांचे सरदार असून चोरीचा माल पोलिसांच्या घरात आढळतोच कसा?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
..तर गायकवाडांना कडक समज द्यावी- फडणवीस
देवेंद्र फडणवीस हे माध्यम प्रतिनिधींशी काल संवाद साधत होते. यावेळी बोलताना पत्रकारांनी त्यांना संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया विचारली. त्यावर ते म्हणाले की, "मला वाटतं की पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाही.
मी स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार आहे की, संजय गायकवाड यांना कडक समज द्यावी. हे असं चालणार नाही. हे योग्य नाही. वारंवार ते असं बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल," अशी तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.
गुन्हा दाखल होताच संजय गायकवाड नरमले
पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर, आमदार संजय गायकवाड यांच्यावर आज गुन्हा दाखल झाला. त्यानंतर संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, गुन्हा दाखल झाला आहे तर त्याला मी सामोरे जाईल. मी केलेल्या वक्तव्यात महाराष्ट्र पोलिसांचा चुकून उल्लेख झाला.
मला ते स्थानिक पोलिसांबद्दल बोलायचे होते. महाराष्ट्र पोलिसांचे धाडस, कर्तृत्व विसरता येणार नाही. ज्या चांगल्या अधिकाऱ्यांना माझ्या वक्तव्याबद्दल मनस्ताप झाला असेल, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, काही लोकांमुळे पोलीस बदनाम झाले आहे. महाराष्ट्र पोलिसांबद्दल बोललेले शब्द मी मागे घेत आहे.
कोरोनाकाळात फडणवीसांवर साधला होता निशाणा
कोरोनाकाळात फडणवीसांवर केली होती जहरी टीका दरम्यान, आमदार संजय गायकवाड यांनी कोरोना काळातही देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केली होती. राज्यासह देशभरात कोरोनानं हाहाकार उडाला आहे. पण विरोधी पक्ष मदत करायचे सोडून राजकारण करत आहे. मला जर कोरोना विषाणू मिळाला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबेन असं विधान संजय गायकवाड यांनी केले होते.












Click it and Unblock the Notifications