'बीआरएसची 'कार' महाराष्ट्रात फसली! नवा भिडू निवडणुकीआधीच गारद, नेते करणार नांदेडमधून नवा पक्ष स्थापन
BRS politics fail in Maharashtra : गतवर्षी राज्याच्या राजकारण एका नव्या भिडूची चर्चा होती. हा नवा भिडू म्हणजे भारत राष्ट्र समिती. या पक्षाने नांदेड मार्गे राज्यात जोरदार एंट्री केली होती. भव्य सभा, जोरदार जाहिरातीबाजी यामुळे हा पक्ष चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे अनेक नेत्यांनी या पक्षात प्रवेश केला. पण, या पक्षाने नंतर पदाधिकारी, कार्यकर्ते यांना कुठलाच कार्यक्रम दिला नाही. एवढेच काय तर लोकसभा निवडणुकीतही उमेदवार दिला नाही. त्यामुळे आता पक्षाचे पदाधिकारी सैरभैर झाले असून, त्यांनी महाराष्ट्र राष्ट्र समिती नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तोही नांदेडमधून. त्यामुळे बीआरएसची कार महाराष्ट्रात फसली आहे.

शेती आणि सिंचनाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात दिमाखदार प्रवेश केलेल्या भारत राष्ट्र समितीने राज्यात लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना हैदराबाद येथील पक्ष मुख्यालयातून कोणतेही आदेश मिळालेले नाहीत.
एक वर्षांपूर्वी तेलंगणातून भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने महाराष्ट्रात राजकीय वाटचाल सुरू केली होती. पक्षाचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी छत्रपती संभाजीनगर शहरात २४ एप्रिल २०२३ रोजी जाहीर सभा घेतली होती. सत्ताधारी भाजपवर टीका करताना त्यांनी तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या विकासाची तुलना केली होती. तेलंगणा आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात पक्षाला उत्तम प्रतिसाद मिळत होता.
शेतकरी संघटनेतील नेत्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला होता. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 'बीआरएस' वाटचाल करणार असल्याचे निश्चित झाले होते. ज्येष्ठ नेते शंकरअण्णा धोंडगे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील, प्रा. यशपाल भिंगे, माणिकराव कदम, कैलास तवार यांनी पक्षात प्रवेश करीत संघटन बांधणी सुरू केली होती. तवार यांनी पैठण तालुक्यात सदस्य नोंदणी मोहीम राबविली होती.
नेमके काय झाले?
'अब की बार किसान सरकार' ही घोषणा देऊन के. चंद्रशेखर राव यांनी राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात केली होती. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही 'केसीआर' यांनी पक्षविस्तार सुरू केला होता. मात्र, जानेवारी २०२३ मध्ये तेलंगणा राज्यात विधानसभा निवडणुकीत'बीआरएस'चा दारुण पराभव होऊन काँग्रेसने सत्ता स्थापन केली. त्यानंतर 'केसीआर' प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर आहेत. परिणामी, महाराष्ट्र ऐन विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात 'गुलाबी वादळ' थंडावले आहे.
नवीन पक्ष कोण स्थापन करणार?
मागील दीड वर्षांपूर्वी महाराष्ट्रात दाखल झालेल्या 'बीआरएस' व त्यांच्या पक्षात प्रवेश केलेल्या राज्यातील अनेक नेत्यांनी 'बीआरएस' पक्षाला सोडचिठ्ठी देत नवा 'महाराष्ट्र राष्ट्र समिती' (एमआरएस) पक्ष स्थापन करण्याचा ठराव घेतला असल्याची माहिती माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांनी काल दिली.
यावेळी माजी आ. मनोहर पटवारी, शंकरराव गोडसे, लक्ष्मण वंगे, माधव जाधव आदींची उपस्थिती होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही 'बीआरएस'च्या नेत्यांनी निवडणूक न लढवण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे आज झालेल्या बैठकीत 'महाराष्ट्र राष्ट्र समिती' हा पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्याने स्थापन केलेला हा पक्ष 'अब की बार किसान सरकार' हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणार आहे.
यासाठी नवीन पक्षाची स्थापना
शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ पाहून लोहा येथे मेळावा घेऊन शंकरअण्णा धोंडगे यांनी 'बीआरएस' पक्षात प्रवेश केला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत उमेदवार देण्याची विनंती केल्यानंतर 'बीआरएस'च्या नेत्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास नकार दिल्याने 'एमआरएस' पक्षाची स्थापना केली. (BRS politics fail in Maharashtra )












Click it and Unblock the Notifications