मोठी बातमी! ‘तीन वाजेपर्यंत सर्व सुरळीत करा, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरू'; कोर्टाचा सरकारला दम
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात आज, २ सप्टेंबर रोजी, मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारवर कठोर ताशेरे ओढत, आज दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व परिस्थिती पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे सरकार आणि आंदोलनकर्ते दोघेही अडचणीत आले आहेत.

न्यायालयात जोरदार युक्तिवाद आणि माफी
आजच्या सुनावणीत, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश मानेशिंदे यांनी मराठा आंदोलकांची बाजू मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, "आंदोलकांकडून मुंबईतील जनतेला जो त्रास झाला, त्याबद्दल मी जरांगे पाटील यांच्या वतीने माफी मागतो." त्याच वेळी, त्यांनी सरकारवरही गंभीर आरोप केले. "आम्हाला ५,००० लोकांच्या आंदोलनाची परवानगी होती, पण सरकारने पार्किंगची सोय फक्त ५०० लोकांसाठी केली होती. इतर लोक स्वतःहून आले होते," असे सांगत मानेशिंदे यांनी आंदोलकांचा बचाव केला.
यावर, न्यायालयाने मानेशिंदे यांना थेट प्रतिसवाल केला. "जेव्हा मुंबईत ५,००० पेक्षा जास्त लोक आले, तेव्हा तुम्ही काय काळजी घेतली? तुम्ही प्रसारमाध्यमांद्वारे लोकांना जास्त संख्या झाल्याबद्दल सांगितले का?" असे प्रश्न न्यायालयाने विचारले.
सरकारवरही न्यायालयाचा रोष
न्यायालयाने केवळ आंदोलनकर्त्यांनाच नाही, तर राज्य सरकारलाही फटकारले. "आम्ही राज्य सरकारवरही अजिबात संतुष्ट नाही. न्यायाधीशांना देखील पायी चालत यावे लागले, इतकी वाईट परिस्थिती होती. सरकारने तात्काळ जागा रिकामी करावी, त्यांच्याकडे परवानगी नाहीये. अन्यथा, आम्ही ३ वाजता आदेश देऊ," असे न्यायालयाने स्पष्ट केले.
न्यायालयाने सरकारला प्रश्न विचारला, "तुम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी काय पावले उचलली? काल मी विमानतळावरून परतत होतो, पण रस्त्यावर एकही पोलिसांची गाडी नव्हती. तुमच्या पोलीस व्हॅन कुठे होत्या? याची माहिती ३ वाजेपर्यंत द्या. अन्यथा, कायद्यानुसार आम्ही कारवाई करू. कोर्टाचा अवमान केल्यास कारवाई केली जाईल."
'शांतता भंग करू नका आणि लोकांना घाबरवू नका'
सतीश मानेशिंदे यांनी पुन्हा सांगितले की, "आम्ही शांत आहोत आणि कायद्याचे पालन करत आहोत." यावर न्यायालयाने शांततेचा संदेश दिला. "स्थानिकांना शांततेत राहू द्या. लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, ते घराबाहेर पडू शकत नाहीत. आम्हाला ३ वाजेपर्यंत सगळं सुरळीत हवं आहे," असे न्यायालयाने ठणकावून सांगितले.
शेवटी, न्यायालयाने सरकारला थेट इशारा दिला. "जर ३ वाजेपर्यंत परिस्थिती सुधारली नाही, तर आम्ही स्वतः रस्त्यावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊ," असे म्हटले. न्यायालयाचा हा सज्जड दम पाहता, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन तातडीने कामाला लागले आहे. या आदेशानंतर आझाद मैदानाबाहेर असलेले आंदोलक हळूहळू माघारी फिरत आहेत. पुढील सुनावणी दुपारी ३ वाजता होणार असून, त्यानंतरच आंदोलनाचे भवितव्य निश्चित होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications