बोईसरच्या मैदानात शिवसेनेचा सामना 'बविआ'शी, विकासकामांच्या जोरावर सेनेच्या विलास तरे यांना अधिक संधी
Boisar Assembly Election 2024 : मुंबईला खेटून असला तरी पालघर जिल्हा इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मागास समजला जातो. या जिल्ह्यात आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे. बोईसर, डहाणू हा परिसर आदिवासी बहुल आहे. पालघर जिल्ह्याच्या शहरी भागावर म्हणजे वसई, विरार आदी पट्ट्यावर बहुजन विकास आघाडी म्हणजेच आमदार हितेंद्र ठाकूर यांचे वर्चस्व आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून देखील बहुजन विकास आघाडीचा आमदार निवडून येतो. हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात बहुजन विकास आघाडीतून दोन वेळा आमदार किती संधी मिळालेले कार्यकर्ते म्हणजे विलास तरे.
राज्यात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक पार पडली असून आता येत्या 23 नोव्हेंबरला निकाल हाती येणार आहे. यात विलास तरेंना मोठी संधी असल्याचे बोलले जात आहे.
जमिनीशी नाळ जुळलेला कार्यकर्ता
अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेले विलास तरे हे जमिनीशी नाळ जोडून असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. सामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देण्यात त्यांची ख्याती आहे. बोईसर परिसरात अनेक विकास कामे त्यांनी आपल्या दहा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत केली. 2009 आणि 2014 साली ते बहुजन विकास आघाडीचे तिकिटावर बोईसर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

2019 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढले असता त्यांचा पराभव झाला आणि बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील बोईसर चे आमदार झाले. त्यानंतर विलास तरे यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतून ते बोईसर विधानसभा मतदारसंघातून 2024 ची विधानसभा निवडणूक लढवीत आहेत.
वाढवण बंदर पालघरसाठी वरदान
पालघर जिल्हा हा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने ही सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे. कारण 76 हजार कोटी रुपये खर्च करून त्यात जिल्ह्यात वाढवण येथे जगातील सर्वात मोठ्या बंदरापैकी एक बंदर बांधले जाणार आहे.केंद्र सरकारने या प्रकल्पाला मान्यता दिली असून, या बंदराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. जिल्ह्याची संपूर्ण आर्थिक व्यवस्था बदलून टाकण्याची क्षमता या एका प्रकल्पात आहे.
जेएनपीटीमुळे नवी मुंबई परिसराचा जो कायापालट झाला तशीच परिस्थिती पालघर जिल्ह्यात होणार आहे. या जिल्ह्यात तिसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एकट्या वाढवण बंदराच्या प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार असून देशाच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराला हे गती येणार आहे. महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरलेला समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडला जाणार असून त्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. त्याशिवाय रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठी गती येणार असून मागास म्हणून ओळखला जाणारा हा जिल्हा राज्याच्या विकासाचे इंजिन ठरणार आहे.
मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन
भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर हा प्रकल्प देखील पालघर जिल्ह्यातून जातो. गुजरात मध्ये या प्रकल्पाच्या कामाला प्रचंड गती आली असून महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र महाराष्ट्रातील प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते. 2022 साली महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वाखाली सरकारने मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती दिली.
या प्रकल्पाच्या माध्यमातून देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई अहमदाबादशी जोडली जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे लाईन हा बहुमान या मार्गाला मिळणार आहे. या प्रकल्पाला जपानचे आर्थिक सहाय्य असून मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन चा काही भाग समुद्राच्या खालून जाणार आहे. पालघर जिल्ह्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्वपूर्ण आहे.
कासा येथे रुग्णालय
पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था हा एक गंभीर विषय आहे. मुंबई, पुणे, ठाणे अशा शहरांचा विकास करताना पालघर सारख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्यवस्थेकडे अनेक सरकारांचे दुर्लक्ष झाले. मात्र कासा येथे दोनशे खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले असून त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सुदृढ होण्याच्या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 57 हजार लाभार्थी
मुख्यमंत्री माझी लाडकी रोहन योजना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अत्यंत महत्त्वाची योजना आहे. पात्र लाभार्थी महिलांना या योजनेच्या अंतर्गत दरमहा दीड हजार रुपये देण्यात येतात. पालघर जिल्ह्यातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली असून 57 हजार 824 महिलांनी योजनेसाठी नोंदणी केली असून बहुसंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे महिला वर्ग महायुती सरकारवर विशेष मेहरबान होण्याची शक्यता आहे.
तरे यांना अधिक संधी
बोईसर मधून शिंदे यांनी उमेदवारी दिलेले विलास तरे हे काही काळ भारतीय जनता पक्षात काम करत होते. निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या अनेक नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे, मुंबादेवी मतदारसंघातून शायना एनसी, पालघर जिल्ह्यातून राजेंद्र गावीत आणि विलास तरे असे नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. शिवसेनेत दाखल होताचं तरे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली.
बोईसर विधानसभा मतदारसंघात तरे यांचा सामना मुख्यत्वाने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीशीच होणार आहे. मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात संघटनेचा प्रचंड विस्तार केला. असंख्य शिवसैनिक शिंदे त्यांच्याशी जोडले गेले आहेत. केंद्राचे विकासाचे अनेक प्रकल्प सध्या पालघर जिल्ह्यातच सुरू आहेत. लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव या निवडणुकीवर पडणार आहे त्यामुळे शिवसेनेचा विलास तरे यांना अधिक संधी असल्याचे पालघर जिल्ह्यातील पंडितांचे मत आहे.












Click it and Unblock the Notifications