"ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबई पाकिस्तान होईल!"; भ्रष्टाचाराचा आरोप करत साटमांचा ठाकरेंवर घणाघात!
Mumbai BMC News, BJP Vs thachkary Brothers : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून, सत्ताधारी महायुती आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी यांच्यात वाकयुद्ध शिगेला पोहोचले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेवर अत्यंत बोचरी टीका केली असून, "जर पुन्हा ठाकरेंचा महापौर झाला, तर मुंबईचे पाकिस्तान होईल," असे खळबळजनक विधान केले आहे. यामुळे मुंबईच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार: ३ लाख कोटींचा दावा
अमित साटम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, "१९९७ ते २०२२ या २५ वर्षांच्या काळात मुंबई पालिकेत तब्बल ३ लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. हा घोटाळा देशातील गाजलेल्या २जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा किंवा कॉमनवेल्थ घोटाळ्यापेक्षाही मोठा आहे. या घोटाळ्यांच्या रकमा १.७६ लाख कोटींच्या आसपास होत्या, पण ठाकरेंनी एकट्या मुंबईला ३ लाख कोटींनी लुटले आहे."
कवितेतून मांडली मुंबईची व्यथा
मुंबई महानगरपालिकेच्या दुरवस्थेवर भाष्य करताना साटम यांनी एका कवितेचा आधार घेतला. या कवितेतून त्यांनी पालिकेची लूट करणाऱ्यांचा हिशोब जनताच मागेल, असे सुचित केले:
"महापालिका रडते आहे, किंचाळत ओरडते आहे... लचके तोडून दशको दशकी, घायाळ तिला ज्यांनी केले, त्या पापांचा हिशोब आता जगाकडे ती मागत आहे."
रस्त्यांच्या खड्ड्यांत २१ हजार कोटींचा चुराडा
मुंबईकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या रस्त्यांच्या प्रश्नावर साटम यांनी माहिती अधिकाराचा (RTI) दाखला दिला. "गेल्या १० वर्षांत केवळ रस्त्यांच्या नावाखाली २१,००० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही मुंबईत खड्डे कायम आहेत. मुंबईत खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे, हेच कळत नाही. हा पैसा नेमका कोणाच्या खिशात गेला?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
घोटाळ्यांचा पाढा आणि 'रिमोट कंट्रोल' सरकार
साटम यांनी ठाकरेंच्या कार्यकाळातील कथित घोटाळ्यांची मोठी यादीच सादर केली.
कोविड घोटाळा
महालक्ष्मी कोविड सेंटर बिल्डरांच्या फायद्यासाठी उभारले गेले. बॉडी बॅग आणि पीपीई किटमध्येही भ्रष्टाचार झाला.
वसुलीचा आरोप
मुंबईतील १७०० बार आणि रेस्टॉरंटमधून खंडणी वसुली करण्यात आली.
प्रकल्प घोटाळे
शिक्षण, पाणी प्रकल्प आणि कचरा व्यवस्थापनात कोट्यवधींचा भ्रष्टाचार.
रिमोट कंट्रोल
पालिकेची स्थायी समिती (Standing Committee) उद्धव ठाकरेंच्या लोकांकडून 'रिमोट कंट्रोल'ने चालवली जात होती, असा दावा त्यांनी केला.
"मराठी माणसाचे की रशीद मामूंचे?"
अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंच्या 'मराठी कार्ड'वरही निशाणा साधला. "ठाकरांनी २५ वर्षांत मराठी माणसासाठी केलेले एक काम दाखवावे. आम्ही बीडीडी चाळीतील पुनर्विकास करून मराठी माणसाला घरे दिली, पण ठाकरांनी स्वतःसाठी फक्त 'मातोश्री २' बांधली. आता ठाकरे मराठी माणसाचे राहिले नसून ते रशीद मामू, चंगद मुलतानी आणि हारून खान यांचे झाले आहेत," अशी विखारी टीका त्यांनी केली.
महायुतीचा 'भगवा' फडकणार?
निवडणुकीच्या निकालाबाबत आत्मविश्वास व्यक्त करताना साटम म्हणाले की, मुंबईवर महायुतीचाच महापौर बसेल आणि पालिकेवर खऱ्या अर्थाने पारदर्शक भगवा फडकेल. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, जनतेला आता विकास हवा आहे, भ्रष्टाचार नाही.












Click it and Unblock the Notifications